अवकाशात सोडलेले उपग्रह पृथ्वीवर पाठविणार वीज, अक्षय ऊर्जेचा पहिला यशस्वी प्रयोग ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 10:04 AM2024-10-27T10:04:04+5:302024-10-27T10:04:45+5:30
इंग्लंडमधील एका स्टार्टअपने पाठवलेला पहिला उपग्रह २०३० पर्यंत वीज पाठवणार असल्याचा दावा केला आहे.
लंडन : पृथ्वीवरील वीज निर्मितीच्या पारंपरिक साधनांवर सध्या तणाव वाढतो आहे. ही साधने संपुष्टात येण्याआधी विजेला पर्याय शोधण्याचा मानवाचा खटाटोप सुरू आहे. अशात अंतराळात पाठवलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून वीज पृथ्वीवर पाठवण्याच्या दिशेने मानवाने पाऊल उचलले आहे.
इंग्लंडमधील एका स्टार्टअपने पाठवलेला पहिला उपग्रह २०३० पर्यंत वीज पाठवणार असल्याचा दावा केला आहे. ही कंपनी अवकाशातून आलेल्या विजेचा पुरवठा आईसलँड परिसराला करणार आहे. ‘स्पेस डॉट कॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रयोग यशस्वी झाल्यास जगातील हा रिन्युएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जेचा पहिला यशस्वी प्रयोग ठरेल.
कशी पाठवणार वीज?
- अवकाशातून वीज पाठवणारा उपग्रह ४०० मीटर रुंद असेल. याचे वजन ७०.५ टन इतके असेल.
- हा पृथ्वीभोवती मध्यम कक्षेत परिक्रमा करीत राहणार आहे. ही कक्षा पृथ्वीपासून २ हजार ते ३६ हजार किलोमीटर या अंतराच्या दरम्यान असेल.
- उपग्रहाद्वारे पृथ्वीवर हाय फ्रिक्वेन्सी रेडियो तरंगाच्या माध्यमातून ऊर्जा पाठवली जाणार आहे.
- जमिनीवर लावलेल्या अँटेनाच्या माध्यमातून ही ऊर्जा स्वीकारली जाईल व पुढे साठवली जाईल. नंतर ती पॉवर ग्रीडमध्ये पाठवली जाईल.