‘बेरोजगारी’विरुद्ध अमेरिकेत संपांचा सिलसिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:14 AM2023-10-19T08:14:04+5:302023-10-19T08:15:04+5:30

आम्हाला योग्य उपचार मिळत नाहीत, आरोग्य सेवा प्रचंड महागडी आहे, योग्य आणि प्रशिक्षित डॉक्टरांचा तुटवडा आहे, याबाबत रुग्णांचा कायम ओरडा तर सुरूच असतो, पण आरोग्य कर्मचारीही फार सुखी आहेत अशातला भाग नाही.

A series of strikes in America against 'unemployment'! | ‘बेरोजगारी’विरुद्ध अमेरिकेत संपांचा सिलसिला!

‘बेरोजगारी’विरुद्ध अमेरिकेत संपांचा सिलसिला!

कोणाचेही उत्पन्न कितीही असो, तो श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी प्रत्येक देशातील आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम असलीच पाहिजे. देशातल्या प्रत्येकाला आरोग्याची सुविधा मिळालीच पाहिजे. गरिबांच्या बाबतीत तर हे जास्तच खरे आहे. कारण श्रीमंत आपल्या गरजेप्रमाणे कुठूनही अतिशय उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळवू शकतो, गरिबांना मात्र हे शक्य होत नाही. त्यांना त्यासाठी मुख्यत्वे सरकारी आरोग्य सेवेवरच अवलंबून राहावे लागते. एकीकडे सरकारी आणि खासगी आरोग्य सेवेचाच तुटवडा, तर दुसरीकडे जे ही सुविधा पुरवतात, त्यांनाही बऱ्याचदा अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, हेही तितकेच खरे आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही हीच स्थिती आहे. 

आम्हाला योग्य उपचार मिळत नाहीत, आरोग्य सेवा प्रचंड महागडी आहे, योग्य आणि प्रशिक्षित डॉक्टरांचा तुटवडा आहे, याबाबत रुग्णांचा कायम ओरडा तर सुरूच असतो, पण आरोग्य कर्मचारीही फार सुखी आहेत अशातला भाग नाही. अमेरिकेत अलीकडेच अक्षरश: हजारो आरोग्य कर्मचारी संपावर गेले! काय कारण होते त्याचे? - या कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते, आम्हाला गुरासारखे राबवून घेतले जाते, त्या तुलनेत पुरेसा पगार दिला जात नाही, पुरेसा जाऊ द्या, अत्यावश्यक तेवढाही पगार आम्हाला मिळत नाही. त्यांचे म्हणणे आहे, आम्ही किमान आपला चरितार्थ चालवू शकू, जिवंत राहू शकू एवढा तरी पगार तुम्ही आम्हाला देणार की नाही? 

अमेरिकेत अरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ‘कैसर परमानंट’ या अतिशय मोठ्या संस्थेच्या जवळपास ७५ हजारांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. नर्सेस, फार्मासिस्ट, टेक्निशियन्स यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. अमेरिकेतली ही सर्वांत मोठी ना नफा तत्त्वावर चालवली जाणारी आरोग्य संस्था मानली जाते. वॉशिंग्टन डीसी आणि अमेरिकेच्या पाच राज्यांतील अरोग्य कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला होता. खरंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संतापाची आणि त्यांच्या संतापाची ही केवळ सुरुवात मानली जातेय. हे प्रकरण पुढे आणखी तापेल आणि इतरही हजारो कर्मचारी संपात उतरतील असे मानले जात आहे. अमेरिकेच्या इतिहासातला आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा संप आहे. 

केवळ तीन दिवसांतच या संपामुळे जवळपास वीस लाख रुग्णांना त्याचा फटका बसला. आरोग्य संस्था आपल्याला कस्पटासमान लेखते, स्वत: कोट्यवधी डॉलर्सचा नफा कमावते, पण जे कर्मचारी त्यासाठी राबले, राबताहेत त्या आपल्याच कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देताना मात्र त्यांचा हात कायमच आखडता असतो, असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ अनेकांनी आपले राजीनामेही संस्थेकडे भिरकावले आहेत.

अमेरिकेत वाढत्या महागाईने आणि बेरोजगारीनेही लोक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळापासून लोकांच्या हालाला पारावार उरलेला नाही. कोरोना सुरू झाला आणि आमच्या भाग्यरेषाच बदलल्या, त्यात दिवसेंदिवस त्रासात वाढच होत आहे, असे नागरिाकांचे म्हणणे आहे. संप पुकारलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे तर म्हणणे आहे, रोजची आमची कामाची शिफ्टच किमान बारा तासांची असते. बऱ्याचदा तर डबल ड्यूटीही करावी लागते. २४-२४ तास काम करून आमच्याच आरोग्याचे बारा वाजलेले असताना आम्ही रुग्णांवर कसे उपचार करायचे, असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

सर्वच क्षेत्रांत बेरोजगारीचा, वेतनाचा प्रश्न आहे. त्यामुळे जनतेत क्षोभ आहे. श्रमाचे आऊटसोर्सिंग केले जाते, याविषयीही त्यांची तक्रार आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न... जो प्रश्न सध्या जगाला भेडसावतोय आणि ज्यावरून येत्या काही काळात अनेक ठिकाणी असंतोष भडकेल, त्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’बद्दलही अनेक कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. एआयचा हा प्रकार त्वरित बंद करावा, त्याने आमच्या नोकऱ्या हिसकवायला आणि आम्हाला बेरोजगार बनवायला सुरुवात केलीय, आमचे घर, संंसार, कुटुंब त्यामुळे रस्त्यावर आलेय, येतेय असेही त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेत असंतोषाचे वारे सध्या खूपच मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेच्या तब्बल २१ राज्यांमध्ये सध्या लहान-मोठ्या प्रमाणात संप अजूनही सुरूच आहे. त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था पार खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. 

अभिनेत्यांनीही आवळली नाडी! 
भरीस भर म्हणजे अमेरिकेत नुकताच हॉलीवूड कलाकार, अभिनेते, लेखक यांनीही संप पुकारला होता. त्यामुळे अमेरिकेचा फिल्म उद्योगच जवळपास ठप्प झाला होता. मोठमोठ्या चित्रपट आणि टीव्ही कंपन्या तसेच त्यांचे प्रसारणही बंद पडल्याने कोट्यवधी डॉलर्सचा फटका या उद्योगाला बसला होता. संपाचे हे लोण इतर क्षेत्रातही पसरेल की काय, या धास्तीने अमेरिका अक्षरश: हादरली आहे.

Web Title: A series of strikes in America against 'unemployment'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.