नायजेरियन राष्ट्राध्यक्षांना चांदीच्या कोल्हापुरी पंचामृत कलशाची भुरळ, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भेट
By संदीप आडनाईक | Published: November 19, 2024 11:49 AM2024-11-19T11:49:44+5:302024-11-19T12:47:31+5:30
पारंपरिक सुबक कारागिरीचा नमुना
कोल्हापूर : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांना कोल्हापूरच्या पारंपरिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण असलेला सिलोफर पंचामृत कलश भेट दिला आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, अतिशय कौशल्याने साकारला आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदी १६ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी नायजेरियाहून ब्राझीलला रवाना झाले. नायजेरिया, ब्राझील आणि गुयाना या देशांना ते भेटी देत आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुजा येथे नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापुरात तयार झालेला 'सिलोफर पंचामृत कलश' भेट म्हणून दिला.
नायजेरियाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच नायजेरिया दौऱ्यावर गेले आहेत. तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. यावेळी मोदी यांना भारत-नायजेरिया संबंधांना बळकट करण्यासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल स्टेट हाऊसमधील एका समारंभात ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ या नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापुरी कारागिरीचे उदाहरण
हा कलश कोल्हापूरच्या पारंपरिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, जो अतिशय कौशल्याने साकारला आहे. यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध धातूकामाचे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम कोरलेले असून, त्यात मुख्यत्वे फुलांचे नमुने, देवता आणि कोल्हापूरच्या पारंपरिक रचनांचा समावेश आहे. कलशाचा दांडा आणि झाकण धार्मिक समारंभांमध्ये वापरण्यासाठी सुलभ आहे. या कलशामधून दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पवित्र पंचामृत दिले जाते.