स्मार्ट घड्याळाने वाचवले महिलेचे प्राण, हृदयाचे ठोके बदलताच दिला अलार्म
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:59 AM2023-06-22T07:59:42+5:302023-06-22T08:00:30+5:30
अमेरिकेतील ओहायोमध्ये अशाच एका स्मार्ट घड्याळामुळे एका आजारी महिलेचे प्राण वाचविण्यात मदत झाली.
सिनसिनाटी (अमेरिका) : स्मार्ट घड्याळ घालणे ही केवळ फॅशनच नाही तर गरजही बनत चालली आहे. सॅटेलाइट लोकेशन ट्रॅकिंग, स्टेप ट्रॅकिंगपासून ते घराबाहेर असताना कॉल करणे आदींसाठी वापर केला जातो. काही लोक शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी आणि हृदय गती निरीक्षणासाठीदेखील ही घड्याळ वापरतात. अमेरिकेतील ओहायोमध्ये अशाच एका स्मार्ट घड्याळामुळे एका आजारी महिलेचे प्राण वाचविण्यात मदत झाली.
येथील किम्मी वॉटकिन्स (२९) यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागले. तिला चक्कर येत होती. बरे वाटण्यासाठी, महिलेने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि झोपी गेली. दरम्यान, तिच्या मनगटावरील स्मार्ट वॉचने तिला हृदयाच्या असामान्य गतीबद्दल अलार्म वाजवून इशारा देण्यास सुरुवात केली. चिंताग्रस्त किम्मी ताबडतोब डॉक्टरांकडे गेली. तपासणी केल्यावर तिला कळाले की तिला रक्त गोठण्याचा (सॅडल पल्मोनरी एम्बोलिझम) विकार आहे. ती सध्या रक्त पातळ करण्याची औषधी घेत आहे आणि स्टॅमिनावर काम करत आहे. डॉक्टरांच्या मते, या प्रकारच्या रक्त गोठण्याच्या बाबतीत, रुग्णांची जगण्याची शक्यता ५० टक्के असते.
जीव वाचवल्याचे श्रेय घड्याळाला
यापूर्वीही अनेक स्मार्ट वॉच वापरकर्त्यांनी त्यांचे प्राण वाचविण्याचे श्रेय आपल्या घड्याळ्याला दिले आहे. स्मार्ट घड्याळांमुळे लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत.
झोपलेल्या महिलेला वेळीच उठवले...
- किम्मी वॉटकिन्स म्हणते की, मी खूप भाग्यवान आहे की घड्याळाने मला सतर्क केले आणि मी डॉक्टरांकडे पोहोचले.
- घड्याळाने मला उठवण्यापूर्वी मी सुमारे दीड तास झोपले होते आणि या स्मार्ट घड्याळाच्या अलार्मने मला जागे केले.
- ती १० मिनिटांपेक्षा जास्त काळ वाजत होती. त्यावेळी महिलेच्या हृदयाची गती १७८ बीट्स प्रतिमिनिट होती, जी अत्यंत गंभीर स्थिती दर्शवत होती.