एलॉन मस्क आता मानवी मेंदूवरही नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, बनवली अशी खास ब्रेन चिप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:04 AM2024-07-11T11:04:33+5:302024-07-11T11:04:33+5:30
Elon Musk News: अमेरिकेतील अब्जाधीश व्यावसायिक एलॉन मस्क हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांची कंपनी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. न्यूरालिंक हा त्यापैकीच एक उपक्रम आहे.
अमेरिकेतील अब्जाधीश व्यावसायिक एलॉन मस्क हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांची कंपनी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करत आहे. न्यूरालिंक हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे. ही कंपनी न्यूरल इंटरफेस टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ही कंपनी मानवी मेंदूशी संबंधित तंत्रज्ञानावर काम करत आहे. ही कंपनी त्यांच्या पहिल्या पेशंटनंतर आता दुसऱ्या पेशंटची ब्रेन चिपच्या माध्यमातून चाचणी करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी बुधवारी सांगितले की, न्यूरालिंक, आपल्या दुसऱ्या पेशंटवरील चाचणीच्या दिशेने जात आहे. कारण मेंदू आणि संगणकाला जोडणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये ती वेगाने पुढे जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर झालेल्या थेट प्रक्षेपणादरम्यान एलॉन मस्क आणि न्यूरालिंकच्या टीमने ब्रेन ट्रान्सप्लांटला व्यापक रूपात उपलब्ध करण्याबाबत कंपनीने केलेल्या प्रगतीसंदर्भातील प्रश्नांची उत्तरं दिली.
तत्पूर्वी जानेवारी महिन्यामध्ये न्यूरालिंकने एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये हे डिव्हाईस यशस्वीरीत्या स्थापित केले होते. ही व्यक्ती पाण्यात उडी मारत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. तसेच तिचे खांद्यापासून खालील शरीर हे लकवाग्रस्त झाले होते. न्यूरालिंकमध्ेय झालेल्या इम्प्लांटेशननंतर या व्यक्तीने बुद्धिबळ, व्हिडीओ गेम खेळणं तसेच आपल्या मेंदूद्वारे कॉम्प्युटर स्क्रीनला नियंत्रित करणं अशी कामं केली.
एलॉन मस्क यांना या तंत्रज्ञानामध्ये खूप रस आहे. तसेच ते या क्षेत्रामध्ये काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहेत. मस्क सांगतात की, या तंत्रज्ञानाद्वारे लोकांना सुपरपॉवर देण्याचं माझं लक्ष्य आहे. तसेच मानवी मेंदू सामान्य अवस्थेपेक्षा अधिक कुशलतेने काम करावा, असे आपले प्रयत्न आहेत.