रशियातील निवडणुकांपूर्वी व्लादिमीर पुतीन यांचा कट्टर विरोधक नेता तुरुंगातून गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:37 AM2023-12-12T09:37:49+5:302023-12-12T09:38:24+5:30
Russia News: रशियामध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवलनी तुरुंगातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे गेल्या दोन दशकांपासून रशियामध्ये निर्विवादपणे सत्ता राबवत आहेत. पुतीन यांच्याबाबत असं म्हटलं जातं की, त्यांच्याविरोधात जो आवाज उठतो तो कायमचा दाबला जातो. काही महिन्यांपूर्वी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी बंडाचा झेंडा उचलला होता. मात्र पुढे त्यांचं काय झालं, हे जगाने पाहिलंय. आता रशियामध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवलनी तुरुंगातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. नवलनी यांच्या वकिलांनी सांगितले की, गेल्या आठवडाभरापासून त्यांच्याबाबत काही माहिती नाही. नवलनी हे भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात नवलनी यांना दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये १९ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा सुनावल्यावर त्यांची मॉस्कोजवळील पीनल कॉलनीतील तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. नवलनी यांचे प्रवक्ते किरा यार्मिश यांनी आरोप केला की, अनेकदा प्रयत्न करूनही त्यांच्या वकिलांची त्यांच्याशी भेट होत नाही आहे. नवलनी हे पीनल कॉलनीमध्ये नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. कैद्यांच्या यादीमध्ये नवलनी यांचं नाव नसल्याचे आपल्याला सांगण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. आम्ही आयके ७ मध्ये नवलनींबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाही. ते कुठे आहेत, हे आम्हाला माहिती नाही. यारम्यान, मॉस्को टाइम्सने सांगितले की, नवलनी यांच्या प्रकृतीबाबत गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.
नवलनी यांच्या समर्थकांनी सांगितले की, त्यांच्या आयुष्यावर मोठं संकट आलेलं आहे. सध्या त्यांना पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्यांची खास सहकारी मारिया पेविचिख यांनी केलेल्या दाव्यानुसार नवलनी यांना सध्या वकिलांना भेटू दिलं जात नाही आहे. तसेच त्यांच्याबाबत कुठलीही माहितीही मिळत नाही आहे. त्यांच्या समर्थकांनी सांगितले की, केवळ राजकीय सुडाच्या भावनेतून त्यांना त्रास दिला जात आहे. नवलनी हे पुतीन यांच्या सत्तेला सातत्याने आव्हान देत आहेत. २०२० मध्ये नवलनी यांना सैबैरियातील ओमस्क शहरातून बर्लिन येथे आणण्यात आले होते. त्यांना आणि एका एजंटवर विषप्रयोग करण्यात आला होता, असा दावा करण्यात आला होता. सुमारे वर्षभर जर्मनीत उपचार घेतल्यानंतर ते २०२१ मध्ये रशियात परत आले तेव्हा २०१३ मधील एका फसवणुकीच्या खटल्याचा हवाला देत अटक करण्यात आली. मात्र ही कारवाई राजकीय सुडातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.