जन्माला आले सात किलोचे सुपरसाइज बालक, दोन फूट उंची; डॉक्टर मंडळीही झाली हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:01 AM2023-01-24T09:01:53+5:302023-01-24T09:02:16+5:30
ब्राझीलच्या ॲमेझॉनास या राज्यामध्ये एका महिलेने सुपरसाइज बालकाला जन्म दिला आहे. त्याचे वजन सात किलो असून, उंची दोन फूट आहे.
ब्रासिलिया :
ब्राझीलच्या ॲमेझॉनास या राज्यामध्ये एका महिलेने सुपरसाइज बालकाला जन्म दिला आहे. त्याचे वजन सात किलो असून, उंची दोन फूट आहे. या आगळ्या बालकाला पाहून डॉक्टर मंडळीही हैराण झाली. त्यांनी सिझेरिअनद्वारे हे बाळंतपण पार पाडले. आपल्या उभ्या आयुष्यात इतक्या मोठ्या आकाराचे तान्हे बालक प्रथमच पाहात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नवजात अर्भकांचे वजन सात किलो कधीच असत नाही. मुलांचे वजन २.८ ते ३.२ किलो, तर मुलींचे वजन २.७ ते ३.१ किलो या दरम्यान असते. ब्राझीलमध्ये जन्मलेल्या सुपरसाइज बालकाचे नाव अँगरसन असे ठेवण्यात आले आहे.
१. बालकाचा जन्म १८ जानेवारी रोजी झाला. त्याची आई क्लेडिन सॅन्टोस २७ वर्षे वयाची आहे. गरोदर क्लेडिन नियमित तपासणीस आली असताना तिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
२. आपल्यापोटी सुपरसाइज बालक जन्माला आल्याची बातमी ऐकून तिलाही प्रथम आश्चर्याचा धक्का बसला होता. क्लेडिनला याआधी पाच मुले झाली आहेत. हे तिचे सहावे मूल आहे.
नेटकऱ्यांकडून अभिनंदन
तिने सांगितले की, माझ्या पोटी सात किलो वजन असलेला मुलगा जन्माला येईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. अँगरसन याच्या बद्दलची माहिती सोशल मीडियावर झळकल्यानंतर नेटकऱ्यांनी क्लेडिनाचे अभिनंदन केले आहे. आगळ्या बालकाची आई होण्याचे भाग्य तुला लाभले आहे, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ब्रिटन, इंडोनेशियातही अशी बालके
याआधी २०१२ साली ब्रिटनमध्ये चेरल मिशेल या महिलेने सुमारे ७ किलो वजनाच्या बालकाला जन्म दिला होता. ब्रिटनमध्ये जन्मलेले ते तिसरे सुपरसाइज बालक आहे, तर चेरलचे हे चवथे अपत्य आहे. तिची याआधीची तीन मुले ही सर्वसाधारण वजनाची होती. २००९ मध्ये इंडोनेशियामध्ये एका महिलेला झालेल्या मुलाची उंची २ फूट व वजन सहा किलोपेक्षा
अधिक होते.