आता रशिया... 48,500 वर्षांपासून झोपलेल्या व्हायरसला केले जागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:01 AM2022-11-30T11:01:47+5:302022-11-30T11:03:31+5:30
संसर्ग टाळण्यासाठी संशोधन सुरू
मॉस्को : रशियन शास्त्रज्ञांनी सायबेरियाच्या पर्माफ्रॉस्ट बर्फात ४८,५०० वर्षांपासून झोपलेल्या अनेक विषाणूंना पुन्हा जिवंत केले आहे. हे रशियाच्या सुदूर पूर्वेकडील सायबेरियातील पर्माफ्रॉस्टच्या ५ वेगवेगळ्या प्रजातींशी संबंधित आहेत. मेगाव्हायरस मॅमथ नावाचे हे विषाणू त्या काळापासूनचे आहेत जेव्हा सायबेरियात हत्तींचे पूर्वज मॅमथ फिरत होते. हिमयुगातील अनेक विषाणू पर्माफ्रॉस्ट बर्फात दबलेले आहेत.
हवामान बदलामुळे बर्फ वेगाने वितळत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दबलेले विषाणू बाहेर येऊ शकतात. जर व्हायरसचा संसर्ग अचानक पसरला तर धोका अधिक असेल. म्हणूनच शास्त्रज्ञांना विषाणू शोधून त्यांचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून त्यांचा संसर्ग टाळण्याचा मार्ग शोधता येईल. असे विषाणू पाणी असलेल्या वातावरणात टिकून राहतात. त्यांच्याकडे स्वतःला दीर्घकाळ जिवंत ठेवण्याची अद्भुत क्षमता आहे.
३ व्हायरस २७ हजार वर्षे जुने
शास्त्रज्ञांनी विषाणूचे नमुने गोळा केले आहेत. यातील काही विषाणू ४८,५०० वर्षे जुने आहेत. तेव्हापासून ते बर्फात झोपले होते. यातील तीन विषाणू सर्वांत नवीन आहेत. त्यांचे वय २७ हजार वर्षे सांगण्यात आले आहे. त्यांना मेगाव्हायरस मॅमथ, पिथोव्हायरस मॅमथ आणि पॅंडोराव्हायरस मॅमथ अशी नावे देण्यात आली आहेत. हे विषाणू मॅमथच्या विष्ठेपासून मिळविले गेले. विष्ठा मॅमथच्या केसांमध्ये होती.
लांडग्याच्या पोटातून काढले दोन व्हायरस
बर्फात मृतावस्थेत सापडलेल्या सायबेरियन लांडग्याच्या पोटातही दोन नवीन विषाणू सापडले आहेत. त्यांची नावे पॅकमॅनव्हायरस ल्युपस आणि पॅंडोराव्हायरस ल्युपस आहेत. गेल्यावर्षीदेखील रशियन शास्त्रज्ञांना सायबेरियन प्रदेशात सुमारे २४ हजार वर्षे जुना विषाणू सापडला होता. सायबेरियाच्या आर्क्टिकला लागून असलेल्या बर्फाळ प्रदेशात ते गोठलेल्या मातीत दबला गेला होता.