दोन वर्षांत अमेरिका-चीनमध्ये युद्ध पेटणार; युएस एअरफोर्स जनरलच्या मेमोने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 03:05 PM2023-01-29T15:05:33+5:302023-01-29T15:05:53+5:30
जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये हे म्हटले आहे. त्यांचे विचार पेंटागॉनचा हेतू सांगत नसले तरी तैवानवरून चीन आणि अमेरिकेतील वाढता तणाव कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला करून वर्ष होत नाही तोच अमेरिका आणि चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. पुढील दोन वर्षांत अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकते, अशी शक्यता अमेरिकेच्या फोर स्टार एअरफोर्स जनरलने व्यक्त केली आहे.
जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये हे म्हटले आहे. त्यांचे विचार पेंटागॉनचा हेतू सांगत नसले तरी तैवानवरून चीन आणि अमेरिकेतील वाढता तणाव कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
मला वाटते की आपण 2025 मध्ये चीनसोबत युद्ध करू. ही भीती चुकीची सिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. त्यामुळे चीनकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे मिनिहन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने यावर खुलासा करताना सांगितले की, ही टिप्पणी अमेरिकेची चीनबद्दलची विचारसरणी किंवा दृष्टिकोन दर्शवत नाही.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, तैवान सामुद्रधुनीवर चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींवरून चीनचे हेतू स्पष्टपणे दिसत आहेत. चीनने गेल्या काही वर्षांत तैवानवर राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबावही वाढवला आहे. तैवानला शांतता हवी आहे, परंतू हल्ला झाल्यास त्याला प्रतिकार नक्कीच केला जाईल.