‘एमक्यूएम’च्या मुख्यालयावर धाड
By Admin | Published: March 11, 2015 11:43 PM2015-03-11T23:43:12+5:302015-03-11T23:43:12+5:30
पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने मुत्ताहिदा कौमी मूव्हमेन्ट (एमक्यूएम) या राजकीय पक्षाच्या कराचीतील मुख्यालयावर धाड टाकून मोठ्या
कराची : पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने मुत्ताहिदा कौमी मूव्हमेन्ट (एमक्यूएम) या राजकीय पक्षाच्या कराचीतील मुख्यालयावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त केली. तसेच कार्यालयाला सीलही ठोकले. या धाडसत्रामुळे कराचीत तणाव निर्माण झाला आहे.
बुधवारी सकाळी पाच वाजता निमलष्करी दलाने एमक्यूएमच्या मुख्यालयावर धाड टाकली. दोन तासाच्या या धाडीत खून आणि अन्य गंभीर गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगारांसह १५ लोकांना ताब्यात घेण्यात आले, असे पाकिस्तान रेंजर्सचे प्रवक्ते कर्नल ताहीर यांनी सांगितले. कराची बंदरातून अफगाणिस्तानकडे नाटोने पाठविलेल्या जहाजातील चोरीला गेलेली शस्त्रेही या मुख्यालयातून जप्त करण्यात आली आहेत. गुप्त खबरीच्या आधारे ही धाड टाकण्यात आल्याचे ताहीर यांनी सांगितले.
धाडीच्या निषेधार्थ एमक्यूएमचे शेकडो कार्यकर्ते मुख्यालयाबाहेर जमले असून हिंसाचाराच्या भीतीने शहराच्या काही भागातील व्यवहार लोकांनी बंद ठेवले.अजिजाबादनजीक एमक्यूएमचे हे मुख्यालय असून या राजकीय पक्षाचे प्रमुख अल्ताफ हुसैन यांचे निवासस्थानही येथेच होते. अल्ताफ हे १९९० पासून कराची सोडून लंडनमध्ये राहतात. (वृत्तसंस्था)