Aamir Liaquat Hussain Video: पाकिस्तानी खासदाराचा बेडरुम व्हिडिओ लीक, देश सोडण्याची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:29 AM2022-05-18T10:29:18+5:302022-05-18T10:29:53+5:30
Aamir Liaquat Hussain Video: पाकिस्तानी खासदार आमिर लियाकतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत पाकिस्तानी नागरिकांची माफी मागितली. तसेच, यात त्याने देश सोडत असल्याची घोषणाही केली.
Aamir Liaquat to leave Pakistan: बेडरुम व्हिडिओ लीक झाल्यानंतर पाकिस्तानी खासदार अमीर लियाकत हुसैनने (Aamir Liaquat Hussain) देश सोडण्याची घोषणा केली आहे. आमिर लियाकतचा हा व्हिडिओ त्याच्या बेडरूममधला असून, त्यामध्ये तो बर्फाचे ड्रग्स(Ice Drugs) घेताना दिसत होता. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्याने पाकिस्तानला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. लियाकतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात रडताना दिसत आहे आणि पाकिस्तानी नागरिकांची माफीदेखील मागत आहे.
आमिर लियाकतने मागितली माफी
आमिर लियाकत हुसैनने इंस्टाग्रामवर 52 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, 'इस्लामचा अभ्यासक व्यसनी कसा असू शकतो.' व्हिडिओ पोस्ट करत आमिर लियाकतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्यामुळे ज्यांची मनं दुखावली गेली आहेत त्या सर्वांची मी माफी मागतो. जाण्यापूर्वी मी त्यांची माफी मागतो, ज्यांनी माझ्यावर कृपा केली. मी आभारी आहे आणि ते ऋण मी मरण्यापूर्वी परत करेन.'
पाकिस्तान जगण्यालायक नाही
आमिर लियाकत व्हिडिओमध्ये पुढे म्हणाला, मी पाकिस्तानातून निघून जात आहे आणि इथे राहणार नाही, कारण हा देश आता राहण्यालायक नाही. येथील वातावरण बिघडले असून माझे मन खूप दुःखी आहे. माझ्याकडे बोटे दाखवून आक्षेपार्ह व्हिडिओसाठी मीम्स बनवण्यात आले. यामुळे मी दुखावलो गेलो, पण तरीही मी हसत राहिलो आणि ते टाळत राहिलो. यूट्यूबवर फिरत असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ काढण्याची तसदी कोणी घेतली नाही.
तिसऱ्या पत्नीबद्दल काय म्हणाला?
व्हिडीओमध्ये आमिर लियाकतने त्याच्या तिसऱ्या पत्नीबद्दलही भाष्य केले. डानियाने चांगले केले नाही, पण मी तिला माफ केले आहे. जर तिने अल्लाहकडे माफी मागितली तर माझ्या घराचे दरवाजे तिच्यासाठी सदैव उघडे आहेत.
पत्नीकडून ड्रग्ज घेतल्याचा आरोप
आमिर लियाकतची तिसरी पत्नी दानिया मलिकने त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे. दानियाने बर्फाचे ड्रग्ज घेत असल्याचा दावा करत व्हिडिओ लीक केला होता. दानियाने आमिर लियाकतपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून तिचे नाव दानिया आमिरवरून बदलून दानिया मलिक केले आहे. विशेष म्हणजे, आमिर लियाकत हुसैन 49 वर्षांचा आहे आणि त्याची तिसरी पत्नी दानिया मलिक फक्त 18 वर्षांची आहे. त्यांच्या वयात 31 वर्षांचा फरक असूनही आमिर लियाकतने दानियाशी लग्न केले.