अमेरिकेत चिमुकलीसह भारतीय कुटुंबाचे अपहरण; युद्धपातळीवर शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 08:52 AM2022-10-05T08:52:11+5:302022-10-05T08:52:44+5:30
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आठ महिन्यांच्या चिमुकलीसह भारतीय वंशाच्या एका कुटुंबाचे अपहरण करण्यात आले आहे.
लॉस एंजल्स : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आठ महिन्यांच्या चिमुकलीसह भारतीय वंशाच्या एका कुटुंबाचे अपहरण करण्यात आले आहे. अपहृतांत चार जणांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. संशयित अपहरणकर्ता सशस्त्र व धोकादायक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
सेंट्रल व्हॅलीतील रहिवासी असलेल्या या कुटुंबाचे मर्केल काउंटीतील एका व्यावसायिक ठिकाणाहून सोमवारी अपहरण करण्यात आले. आरोही (८ महिने), तिची आई जसलीन कौर (२७), वडील जसदीपसिंग (३६) व काका अमनदीपसिंग (३९) अशी अपह्रतांची नावे आहेत. मर्केल काउंटीच्या शेरिफ कार्यालयाने संशयित अपहरणकर्त्याची दोन छायाचित्रे जारी केली आहेत. त्यात अपहरणकर्त्याचे डोके भादरलेले दिसते.
युद्धपातळीवर शोध
आतापर्यंत संशयिताने संपर्क साधला नाही तसेच खंडणीची मागणीही केलेली नाही, असे मर्केल काउंटीचे शेरिफ वर्न वारन्के यांनी सांगितले. संशयित सशस्त्र आणि धोकादायक आहे असे आम्ही मानतो. याचा छडा लागत नाही तोपर्यंत आमचे अधिकारी २४ तास काम करतील. संशयित दिसून आल्यास शेरिफ कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याच्याशी किंवा पीडितांशी संपर्क करू नये, असे आवाहन आम्ही जनतेला केले आहे, असेही शेरिफ वारन्के म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"