५४ मुले आणि ६ बायका असलेल्या व्यक्तीचे निधन; मुलांनी मांडली व्यथा, सरकारवर केले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:00 PM2022-12-11T17:00:03+5:302022-12-11T17:01:59+5:30
५४ मुले आणि ६ बायका असलेल्या अब्दुल मजीद मंगल यांचे निधन झाले आहे.
नवी दिल्ली : ५४ मुले आणि ६ बायका असलेल्या अब्दुल मजीद मंगल यांचे निधन झाले आहे. ७५ वर्षीय मजीद यांना हृदयविकाराचा त्रास होता. ते पाकिस्तानातील नोश्की जिल्ह्यातील रहिवासी असून ट्रकचालक म्हणून काम करत होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी पहिले लग्न केले होते. खरं तर अब्दुल मजीद यांनी ६वेळा लग्न केले होते. यातील दोन पत्नींचे यापूर्वीच निधन झाले आहे. मजीद यांच्या ५४ मुलांपैकी १२ मुले देखील ते जिवंत असतानाच मरण पावली आहेत, तर ४२ मुले हृयात आहेत, ज्यामध्ये २२ मुले आणि २० मुली आहेत.
मशीद यांचा मुलगा शाह वली याने बीबीसीशी संवाद साधताना म्हटले, ५४ मुलांच्या गरजा भागवणे सोपे काम नव्हते, पण आमच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले होते. म्हातारपण असूनही त्यांनी मृत्यूच्या पाच दिवस आधीपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाडी चालवली. मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवताना वडिलांना विश्रांती घेताना मी कधीही पाहिले नाही. ते सतत काही ना काही काम करत असे, असे शाह वली याने आणखी सांगितले.
मुलांनी मांडली व्यथा
"आमच्यापैकी काहींनी बीएपर्यंत तर काहींनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले आहे. पण आम्हाला आता रोजगार नाही. आर्थिक चणचणीमुळे वडिलांवर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. सरकारी मदतही मिळाली नाही. दुसरीकडे, भीषण पुरामुळे घर उद्ध्वस्त झाले. एकाच वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते", असे मृत अब्दुल मजीद यांच्या मुलाने सांगितले.
जनगणनेमुळे मिळाली प्रसिद्धी
अब्दुल मजीद मंगल आणि त्यांचे कुटुंब २०१७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले, त्यावेळी पाकिस्तानात जनगणना सुरू होती. २०१७च्या जनगणनेपूर्वी क्वेटा शहरातील जान मोहम्मद खिलजी हा सर्वाधिक मुलांचा पिता असल्याचा दावा केला जात होता. त्याला ३६ मुले होती. मात्र या जनगणनेमुळे अब्दुल मजीद जगासमोर आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"