अभिजित बॅनर्जी व पत्नीला अर्थशास्त्राचा नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 06:43 AM2019-10-15T06:43:50+5:302019-10-15T06:45:09+5:30

मुंबईत जन्म; जेएनयूमध्ये शिक्षण : मायकेल क्रेमर यांचाही सन्मान

Abhijit Banerjee and wife awarded by Nobel in Economics | अभिजित बॅनर्जी व पत्नीला अर्थशास्त्राचा नोबेल

अभिजित बॅनर्जी व पत्नीला अर्थशास्त्राचा नोबेल

googlenewsNext

ऑस्लो : अमेरिकेचे नागरिक असलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित विनायक बॅनर्जी, त्यांच्या फ्रेंच पत्नी एश्थर ड्युफ्लो आणि अमेरिकेचे प्रा. मायकेल क्रेमर या तिघांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. अर्थशास्त्रातील सैद्धांतिक संशोधनाबद्दल हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे प्रा. बॅनर्जी हे डॉ. अमर्त्य सेन यांच्यानंतरचे भारतीय वंशाचे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत.


५८ वर्षांचे प्रा. बॅनर्जी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट््स इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या डॉ. ड्युफ्लो त्याच संस्थेत दारिद्र्य निर्मूलन व विकास अर्थशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक आहेत. प्रा. क्रेमर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात ‘विकसनशील समाज’ या विषयाचे प्राध्यापक आहेत. अवघ्या ४७ वर्षांच्या असलेल्या प्रा. ड्युफ्लो या अर्थशास्त्राचील नोबेलच्या सर्वात तरुण मानकरी अणि हा पुरस्कार मिळविणाºया दुसºया महिला आहेत.


डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार सुरू झालेल्या मूळ पुरस्कारांमध्ये अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा समावेश नाही. हा पुरस्कार नंतर स्वीडनच्या स्वेरिग्ज रिक्सबँकेने नोबेल यांच्या सन्मानार्थ सुरू केला. पुरस्काराची ९० लाख स्वीडिश क्रोनरची रक्कम बॅनर्जी, ड्युफ्लो व क्रेमर यांना समान वाटून दिली जाईल. नोबेल यांच्या स्मृतिदिनी १० डिसेंबर रोजी स्वीडनच्या सम्राटांच्या हस्ते सर्व नोबेल पुरस्कारांचे वितरण होईल.


दारिद्र्य निर्मूलनासाठी नवा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन विकसित करण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे रॉयल स्वीडिश अकादमीने नमूद केले. अकादमीने म्हटले की, बॅनर्जी, ड्युल्फो व क्रेमर या तिघांच्या संशोधनामुळे जागतिक पातळीवर दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम राबविणे अधिक सुलभ झाले. गेल्या दोन दशकांत या तिघांनी प्रयोगनिष्ठ संशोधनातून जे निष्कर्ष काढले, त्याने विकास अर्थशास्त्र या ज्ञानशाखेत आमूलाग्र परिवर्तन झाले व आता अर्थशास्त्रातील ही स्वतंत्र संशोधन शाखा म्हणून बहरली आहे.
या तिघांच्या संशोधनामुळे जी नवी दिशा व सिद्धांत प्रस्थापित झाले, त्यावर बेतलेल्या योजना व कार्यक्रमांचा फायदा जगभरातील ४० कोटींहून अधिक गरिबांना मिळत आहे. भारतापुरतेच बोलायचे, तर या तिघांनी मुंबई व बडोदे येथील शाळांमध्ये प्रायोगिक स्वरूपात केलेल्या कामातून ज्या योजना आखल्या गेल्या, त्यातून ५० लाख मुलांमध्ये शैक्षणिक सुधारणा झाल्या. शिवाय अनेक देशांच्या सरकारांनी अनुदानित स्वरूपात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा देण्याचे कार्यक्रम सुरू केले. त्यांच्या कामाचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून दारिद्र्य निर्मूलनाचे काम करणारी सरकारे व खासगी संस्थांच्या कामाच्या स्वरूपात व वैचारिक बैठकीत मोठे बदल झाले आहेत.


अकादमीने म्हटले आहे की, गेल्या दोन दशकांत जगभर लोकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. १९९५ ते २०१८या काळात जगातील सर्वात गरीब देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) दुपटीने वाढ होऊन लोकांची आर्थिक स्थिती सुधारली. बालमृत्यूचे प्रमाण १९९५ च्या तुलनेत निम्म्यावर आले आहे व शाळेत जाणाºया मुलांचे प्रमाण ५६ टक्क्यांवरून वाढून ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. तरीही अजून खूप मोठे आव्हान शिल्लक आहे. जगभरात ७० कोटींहून अधिक लोकांना अत्यल्प उत्पन्नात गुजराण करावी लागत आहे, स्वस्त आणि सोप्या उपायांनी जे टाळता येऊ शकतात, अशा आजारांनी दरवर्षी ५० लाखांहून अधिक बालके पाच वर्षांची होण्याआधीच मृत्यूमुखी पडत आहेत आणि जगभरातील निम्मी मुले अक्षरओळख न होताच शाळा सोडत आहेत.


तिघांनी अर्थशास्त्रीय मार्ग दाखवून दिला
अकादमीने म्हटले की, तिन्ही पुरस्कार विजेत्यांनी केलेले काम म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण दारिद्र्य हा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे हा विचार केंद्रस्थानी ठेवून त्यांनी एकेक विषय स्वतंत्रपणे हाताळून दारिद्र्यावर कशी परिणामकारकपणे मात केली जाऊ शकते, हे प्रयोगसिद्ध सिद्धांतांनी दाखवून दिले आहे. या तिघांनी ज्याच्या अभावाने इच्छा असूनही दारिद्र्यातून बाहेर पडू शकत नाहीत, अशा शिक्षण, आरोग्य, लसीकरण, लघु वित्तसाह्य अशा विविध पैलूंचा प्रयोगसिद्ध अभ्यास करून व्यक्ती आणि समाजांच्या ठराविक गरजांनुरूप हे अडसर दूर करण्याचे अर्थशास्त्रीय मार्ग दाखवून दिले. (वृत्तसंस्था)

भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान स्थितीत
भारताची अर्थव्यवस्था सध्या दोलायमान स्थितीत आहे व नजीकच्या भविष्यात ती सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच व्यक्त केले.
अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला नोबेल मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रा. बॅनर्जी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान आहे. विकासदराची ताजी आकडेवारी पाहता, नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्था सावरेल, याची खात्री देता येत नाही. गेली पाच-सहा वर्षे निदान काही विकास होताना तरी दिसत होता, पण ती आशाही आता मावळली आहे.
पुरस्काराविषयी ते म्हणाले की, ज्यासाठी पुरस्कार दिला, त्या विषयावर मी गेली २० वर्षे संशोधन करत आलो आहे. त्यातून आम्ही दारिद्र्य निर्मूलनाच्या समस्येवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, पण करिअरमध्ये एवढ्या लवकर हा पुरस्कार मिळेल, असे वाटले नव्हते.

Web Title: Abhijit Banerjee and wife awarded by Nobel in Economics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.