कंबोडियातील हॉटेलला भीषण आग, 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी; जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:02 PM2022-12-29T13:02:28+5:302022-12-29T13:04:04+5:30
Cambodia Hotel Fire : ग्रँड डायमंड सिटी हॉटेलच्या कॅसिनोमध्ये सुमारे 50 लोक अडकल्याचीही माहिती समोर आली आहे.
कंबोडियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलमधील कॅसिनोला भीषण आग लागली आहे. या आगीत जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने कंबोडियन पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, थायलंडच्या सीमेवर असलेल्या कंबोडियन हॉटेल-कसिनोमध्ये ही दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पोयपेट येथील ग्रँड डायमंड सिटी हॉटेलला आग लागली.
आगीच्या घटनेचे अनेक भयंकर व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या इमारतीवरून उड्या मारताना दिसत आहेत. ग्रँड डायमंड सिटी हॉटेलच्या कॅसिनोमध्ये सुमारे 50 लोक अडकल्याचीही माहिती समोर आली आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने तसेच अनेक जण आगीत अडकल्याने या प्रकरणात मृतांचा आकडा देखील वाढू शकतो.
#BREAKING 'About 10 killed, 30 injured' in Cambodia hotel casino fire: police pic.twitter.com/1i6Z44hz8G
— AFP News Agency (@AFP) December 29, 2022
जीव वाचवण्यासाठी अनेकांनी मारल्या उड्या
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये आग अनेक तास धुमसत होती. सगळीकडे गोंधळ झाला. लोकांनी आरडाओरडा केला. हॉटेलच्या इमारतीवरून जळणारे साहित्य खाली पडत होते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पाचव्या मजल्यावरच्या बाल्कनीतून उड्या मारल्या. आगीमुळे हॉटेलचा काही भाग कोसळला आहे. अग्निशमन दलाने आगीवर 70 टक्के नियंत्रण मिळवल्याचा दावा केला.
53 जणांना वाचवण्यात यश
स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता आग लागली. अथक परिश्रमानंतर या आगीतून एकूण 53 जणांना वाचवता आले. आग इतकी भीषण होती की, लोकांना वाचवण्यात टीमला अडचणी येत होत्या. अग्निशमन दल आणि बचाव पथकासोबत स्थानिक लोकही सहभागी झाले आणि त्यांनी लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"