अबब ! ६८ वर्षीय महिलेने ७७१ वेळा दिली ड्रायव्हिंग टेस्ट
By admin | Published: March 31, 2016 02:46 PM2016-03-31T14:46:12+5:302016-03-31T16:50:11+5:30
दक्षिण कोरियामधील 68 वर्षीय जिद्दी महिलेने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एक-दोन वेळा नाही तर तब्बल 771 वेळा प्रयत्न केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
सेऊल, दि. ३१ - अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. पण जर वारंवार अपयश मिळत असेल तर अनेकजण प्रयत्न करणेच सोडून देतात. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही कितीवेळा प्रयत्न कराल ? असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर कदाचित दोन आकड्यांच्या पुढे जाणार नाही. मात्र दक्षिण कोरियामधील 68 वर्षीय जिद्दी महिलेने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एक-दोन वेळा नाही तर तब्बल 771 वेळा प्रयत्न केला आहे. ऐकून तुमचा विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे.
या आजीबाईंना चा नावाने ओळखलं जात. 2005 पासून ही महिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 'सुरुवातीला तर प्रत्येक दिवशी ही महिला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी यायची. हा एक रोकॉर्डब्रेकींग नंबर असल्याचं', पोलीस अधिकारी चोई याँग-चेओल सांगतात. चा पुन्हा 772व्यांदा प्रयत्न करेल असा विश्वासदेखील अधिकारी व्यक्त करतात.
'ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घेण्यात येणा-या प्राथमिक लेखी परिक्षेतच चा नापास होत आहे. पास होण्यासाठी 100 पैकी 60 गुणांची आवश्यकता आहे, मात्र चा यांना 30 ते 35 गुणच मिळत आहे. ड्रायव्हिंग टेस्टसाठी आतापर्यंत चा ने 2 लाखाहून जास्त पैसे खर्च केले आहेत. कारण प्रत्येक टेस्टसाठी 285 रुपये खर्च आहे', अशी माहिती पोलीस अधिकारी चोई याँग-चेओल यांनी दिली आहे.
चा घरोघरी जाऊन घरगुती सामान आणि फळ विकण्याचं काम करतात. यासाठी त्यांनी सर्व सामान हातात घेऊन फिरावं लागतं. मात्र या कामासाठी आपली कार असावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचा चा प्रयत्न करत आहे. 'चा जेव्हा जेव्हा नापास होतात तेव्हा मला दुख: होतं मात्र जेव्हा त्या पास होतील तेव्हा मी आनंद साजरा करेन', असं पोलीस अधिकारी चोई याँग-चेओल यांनी सांगितलं आहे.