फरार गुन्हेगाराला बांगलात परत पाठविले
By admin | Published: November 14, 2015 01:23 AM2015-11-14T01:23:25+5:302015-11-14T01:23:25+5:30
‘उल्फा’चा जहाल नेता अनुप चेतिया याला भारताच्या स्वाधीन केल्यानंतर दोन दिवसांनी २०१४ मध्ये बांगलादेशातील नारायणगंज येथे झालेल्या खळबळजनक हत्याकांडातील प्रमुख आरोपी
ढाका : ‘उल्फा’चा जहाल नेता अनुप चेतिया याला भारताच्या स्वाधीन केल्यानंतर दोन दिवसांनी २०१४ मध्ये बांगलादेशातील नारायणगंज येथे झालेल्या खळबळजनक हत्याकांडातील प्रमुख आरोपी नूर हुसैन याला भारताने बांगलादेशच्या हाती सोपविले.
त्याचे प्रत्यार्पण करण्याचा आदेश बांगलादेशने दिला होता. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी उशिरा रात्री नूर हुसैन याला जैसोरमधील पश्चिम बेनापोल सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (बीजीबी) हवाली करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गृहमंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला की, सीमेवर शून्य रेषेच्या दुसऱ्या बाजूला ‘बीजीबी’चे मेजर लियाकत यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी त्याला ‘रॅपिड अॅक्शन बटालियन’ (आरएबी) च्या अधिकाऱ्यांना सोपविले. त्याला त्यांनी अत्यंत कडक बंदोबस्तात ढाक्याला नेले. नारायणगंज शहराच्या पोलिसांनी नंतर त्याला राजधानीच्या उत्तरा या भागातील ‘आरएबी’च्या मुख्यालयात नेल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. तो आता आपल्या ताब्यात असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात पेश केले जाईल, असे नारायणगंज येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तो एक सहयोगी कौन्सिलरसह सात जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळला होता.