आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 07:33 PM2019-10-27T19:33:56+5:302019-10-29T20:03:35+5:30
अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती.
वॉशिंग्टन: 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. त्याच्यासोबत तीन मुले आणि इतर सहकाऱ्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. या वृत्ताला अअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे.
अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान अमेरिकेने भूसुरुंगात अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले आहे. याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, "काल रात्री अमेरिकेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादी म्होरक्याला न्यायासमोर आणले. अबू बक्र अल-बगदादी ठार झाला आहे. जगातील सर्वात निर्दयी आणि हिंसक दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तो संस्थापक आणि म्होरक्या होता."
US President Donald Trump: Last night the United States brought the world's number one terrorist leader to justice. Abu Bakr al-Baghdadi is dead. He was the founder and leader of ISIS, the most ruthless and violent terror organisation anywhere in the world. pic.twitter.com/k1RoL4HlHX
— ANI (@ANI) October 27, 2019
दरम्यान, एप्रिलमध्ये आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. पाच वर्षात प्रथमच आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ जारी केला होता. मात्र तो व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. या व्हिडीओत त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता.
बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आले होते.