अबू बकर अल-बगदादीचा मुलगा ठार, आयसीसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 02:10 PM2018-07-05T14:10:27+5:302018-07-05T14:10:53+5:30
हुतैफा अल- बद्री असे त्याचे नाव असून हातात रायफल घेतल्याचे त्याचे एक चित्रही आय़सीसने या बातमीबरोबर प्रसिद्ध केलं आहे.
बैरुत- आयसीसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीचा मुलगा सीरियाच्या सरकारविरोधात लढताना मरण पावल्याचे आयसीसने स्पष्ट केले आहे. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आयसीसने समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. हुतैफा अल- बद्री असे त्याचे नाव असून हातात रायफल घेतल्याचे त्याचे एक चित्रही आय़सीसने या बातमीबरोबर प्रसिद्ध केलं आहे.
Son of ISIS kingpin Abu Bakr al-Baghdadi reportedly killed in Syria https://t.co/MZf0C3TW69pic.twitter.com/zJ00iQYigH
— New York Daily News (@NYDailyNews) July 5, 2018
हुतैफा अल बद्री चांगला लढवय्या होता आणि रशियन व सीरियन फौजांशी लढताना मध्य होम्स प्रांतात तो मारला गेला असे आयसीसने सांगितले आहे. मात्र तो कधी मारला गेला याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. अल बगदादी हा जखमी झाला किंवा मरण पावला अशा अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत मात्र त्याच्या मृत्यूबद्दल अनेकदा शंका घेतली जाते. त्याच्या कुटुंबाबद्दलही फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. 2014 साली त्याच्या कथित पत्नी आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले होते.
बगदादी नक्की कितीवेळा मारला गेला?
जून 2016
दरम्यान, जून 2016 मध्ये इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी नाटोच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली होती. तथापि, अमेरिका किंवा इतर देशांकडून याला दुजोरा मिळू शकला नव्हता. ओसामा बिन लादेननंतरचा जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबू बकरवर १६० कोटी रुपयांचे बक्षीस आहे. नाटोने इसिसचा सीरियातील बालेकिल्ला असलेल्या रक्कामध्ये केलेल्या हल्ल्यात अबू मारला गेल्याचे या वृत्तात म्हटले गेले होते.
जुलै 2017
सीरियामधील निरीक्षक गटाने सूत्रांच्या हवाल्याने अबू बकर अल बगदादी ठार झाल्याचा दावा केला होता. सीरियामध्ये मानवी हक्कासाठी हा निरीक्षकांचा गट कार्यरत आहे. यापूर्वी सुद्धा अनेकवेळा बगदादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला.
निरीक्षकांचा हा गट सीरियामधील गृहयुद्धावर विश्वसनीय माहिती देण्यासाठी ओळखला जातो. सीरियाच्या पूर्वेकडे असणा-या डायर-अल-झोर शहरातील सूत्रांच्या हवाल्याने निरीक्षकांच्या गटाने बगदादी ठार झाल्याचे म्हटले आहे. पण तो कधी मारला गेला ते निरीक्षकांच्या गटाने स्पष्ट केलेले नव्हते.
मे 2017 महिन्याच्या शेवटी रशियानेही बगदादी हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला होता. रशियाला इसीसच्या प्रमुखांची बैठक होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. यानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला अशी अधिकृत माहिती मंत्रालयाने आपल्या फेसबूक पेजवरुन दिली होती. 8 मे रोजी इसिसच्या प्रमुखांमध्ये होणा-या बैठकीची जागा आणि वेळ माहिती करुन घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यानंतर रात्री 12.30 ते 12.45 दरम्यान हवाई दलाने ज्या ठिकाणी बैठक सुरु होती त्या कमांड पॉईंटवर हवाई हल्ला केला", अशी माहिती मंत्रालयाने दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला इसीसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी देखील उपस्थित होता. या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे अशी माहिती होती. हल्ल्यात इसीसचे अनेकजण ठार झाले होते. जवळपास 30 फिल्ड कमांडर्स आणि 300 पर्सनल गार्ड ठार झाले असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला होता.