ट्रम्प यांचा खुल्या मनाने स्वीकार
By admin | Published: November 10, 2016 05:09 AM2016-11-10T05:09:40+5:302016-11-10T05:09:40+5:30
ट्रम्प यांचा आम्ही खुल्या मनाने स्वीकार करीत आहोत, असे सांगत हिलरी क्लिंटन यांनी अतिशय विनम्रतेने आपला पराभव स्वीकारला.
ट्रम्प यांचा आम्ही खुल्या मनाने स्वीकार करीत आहोत, असे सांगत हिलरी क्लिंटन यांनी अतिशय विनम्रतेने आपला पराभव स्वीकारला. ट्रम्प हे सर्व अमेरिकन नागरिकांसाठी यशस्वी अध्यक्ष ठरतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थकांना संबोधित करताना हिलरी क्लिंटन म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष होत आहेत. खोलवर विभागले गेलेले हे राष्ट्र ट्रम्प यांचा खुल्या मनाने स्वीकार करीत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाला संधी देत आहे. निवडणूक हरल्याची सल दीर्घकाळ आपल्याला राहील असे सांगून हिलरी म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प यांना आपण शुभेच्छा दिल्या आहेत आणि देशासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मी अशी अपेक्षा करते की, अमेरिकन नागरिकांसाठी ट्रम्प हे एक यशस्वी अध्यक्ष ठरतील. आम्हाला हे निकाल स्वीकारावे लागतील आणि भविष्याच्या दिशेने पाहावे लागेल. तुम्ही किती निराश आहात ते मी समजू शकते. आमचे अभियान हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नव्हते. देशाप्रती असलेले आमचे प्रेम आणि अमेरिकेच्या निर्माणासाठीचे ते अभियान होते, असेही हिलरी क्लिंटन म्हणाल्या.