अमेरिकेत गुणवंतांनाच प्रवेश मिळावा - ट्रम्प; घुसखोरांविरोधात मेक्सिको सीमेवर भिंत हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:57 AM2019-01-04T00:57:26+5:302019-01-04T00:57:45+5:30
अमेरिकेच्या विकासास हातभार लावू शकतील अशा गुणवंत लोकांनाच अमेरिकेत प्रवेश मिळायला हवा, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या विकासास हातभार लावू शकतील अशा गुणवंत लोकांनाच अमेरिकेत प्रवेश मिळायला हवा, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. बेकायदेशीर आगमन रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर आपल्याला भिंत बांधायची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. अमेरिकेच्या आव्रजन (इमिग्रेशन) व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. व्हिसासाठी लॉटरी काढण्याचा मूर्खपणा आम्ही संपवू इच्छितो. अमेरिकेत येणाऱ्या लोकांची निवड दैवाच्या हवाल्याने नव्हे, तर पूर्णत: गुणवत्तेच्या निकषावर व्हायला हवी, अशी आमची इच्छा आहे.
ट्रम्प म्हणाले की, आमच्याकडे भरपूर कंपन्या आहेत. ज्या कंपन्या बाहेर गेल्या होत्या त्याही आता परत येत आहेत. लोकांनी आमच्या देशात यावे, अशी आमची इच्छा आहे; पण लोकांना आपल्या देशात आणणाºया व्यवस्थेत त्रुटी नसाव्यात.
या त्रुटी दूर करून केवळ गुणवत्ताधारकांनाच देशात येता येईल, अशी व्यवस्था आम्हाला आणायची आहे. या देशात कायदेशीर मार्गानेच लोकांना येता यावे, अशी आमची इच्छा आहे.
अल्पवयीनांची तस्करी
ट्रम्प म्हणाले की, सीमेवरील गस्ती पथकांना दररोज २ हजार बेकायदेशीर घुसखोरांचा सामना करावा लागतो. दर आठवड्याला ३०० अमेरिकी नागरिक हेरॉईनच्या सेवनामुळे मरण पावतात. हे हेरॉईन दक्षिण सीमेवरून बेकायदेशीररीत्या अमेरिकेत येते. ही सीमा बंद करणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यात २० हजार अल्पवयीन मुलांना तस्करीच्या मार्गाने अमेरिकेत आणले गेले.