अपघाताने लाभली अलौकिक प्रतिभा!
By admin | Published: May 17, 2015 02:14 AM2015-05-17T02:14:01+5:302015-05-17T02:14:01+5:30
सहा वर्षांपूर्वीचा अपघात होण्यापूर्वी तिला कवितेचा गंध नव्हता की चित्रकलेत गती नव्हती. गणितासारख्या क्लिष्ट विषयाशी तर तिचा दुरान्वयानेही संबंध नव्हता.
न्यूयॉर्क : सहा वर्षांपूर्वीचा अपघात होण्यापूर्वी तिला कवितेचा गंध नव्हता की चित्रकलेत गती नव्हती. गणितासारख्या क्लिष्ट विषयाशी तर तिचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्या अपघाताने मेंदूला झालेल्या जबर दुखापतीमुळे पूर्वायुष्याच्या तिच्या स्मृतीही पूर्णपणे पुसल्या गेल्या. पण मेंदूच्या या दुखापतीमुळेच आता ती एक अलौकिक प्रतिभावंत बनली आहे. ती आता आवाज ‘पाहू’ शकते व ‘रंग’ ऐकू शकते. ती आता एक सिद्धहस्त कवयित्री झाली असून, तिचे घर तिने काढलेल्या सुंदर चित्रांचे जणू कलादालन बनले आहे!
वैद्यकशास्त्रालाही थक्क करणारी ही कहाणी आहे लीघ एर्सेग या ४७ वर्षांच्या महिलेची. कोलोराडो राज्याच्या वायव्य भागातील मोफ्फॅट काउंटीमधील मेबेल वसाहतीमध्ये लीघचा पूर्वी पशुपालनाचा ‘रँच’ होता व तिचे व्यक्तिमत्त्व ‘टॉमबॉय’ला साजेसे होते. मात्र २००९ मधील अपघाताने तिचे व्यक्तिमत्त्व व आयुष्यही आमूलाग्र बदलले. लीघ तोल जाऊन रँचमधील एका खोल घळीत पडली आणि त्या दुखापतीने तिच्या मेंदू आणि मज्जारज्जूसह एकूण चेतासंस्थेमध्ये एकाच वेळी बरे आणि वाईट असे बदल झाले. वाईट अशासाठी की मेंदूच्या या आघाताने लीघ
गतआयुष्याच्या स्मृती पार गमावून बसली. ही विस्मृती
एवढी पराकोटीची आहे की तिला स्वत:च्या आईचे नाव आठवत नाही की ती तिला ओळखतही नाही! चांगले असे की, ज्या संज्ञानी क्षमता (कॉग्नेटिव्ह अॅबिलिटिज) तिच्यात जन्मजात नव्हत्या, त्या उत्पन्न झाल्या.
लीघची ही कहाणी ‘एबीसी’ चित्रवाहिनीने वैद्यकविश्वातील एक अघटित म्हणून जगापुढे आणली. लीघच्या सद्य:स्थितीचे तज्ज्ञांनी जे निदान केले, त्यातून ही केस वैद्यकशास्त्रात एकमेवाद्वितीय मानली
जात आहे.