अॅसिड हल्ल्याचा तिने केला देखणा मुकाबला, विद्रूप चेहरा तीन महिन्यात बनला ईद का चाँद
By Darshana.tamboli | Published: September 6, 2017 01:38 PM2017-09-06T13:38:39+5:302017-09-06T13:40:54+5:30
तरूणींवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटना आपण याआधीही पाहिल्या आहेत.
लंडन, दि. 6- तरूणींवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटना आपण याआधीही पाहिल्या आहेत. या हल्ल्यानंतर शारीरिक तसंच मानसिक त्रासाचा पीडितेला सामना करावा लागतो. हल्ल्यानंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभं राहणंही तितकंच कठीणही जातं. पण लंडनमधील अॅसिड हल्ला झालेल्या तरूणीचा हा फोटो पाहिल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. जून महिन्यात अॅसिड हल्ला झालेल्या एका 21 वर्षीय तरूणीने तिच्या प्रकृतीत वेगाने होत असलेल्या सुधारणेचा फोटो शेअर केला आहे. त्या तरूणीचा फोटो सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. बिझनेस मॅनेजमेंटची विद्यार्थी तसंच मॉडल असलेल्या रेशम खान या तरूणीवर 21 जून 2017 रोजी तिच्या एकसाव्या वाढदिवसाच्या दिवशी सल्फर अॅसिड अंगावर फेकून हल्ला झाला होता. लंडनमध्ये सकाळी चुलत भावाबरोबर ड्राइव्हवर जाताना ही घटना घडली होती. या अॅसिड हल्ल्यात रेशमचा चेहरा भाजला होता. तसंच शरीरावरही अॅसिड पडल्याने काही ठिकाणी भाजलं होतं. अॅसिड हल्ल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात रेशमने तिच्या प्रकृतीत सुधारणा करून दाखवली. ईदच्या दिवशी तिने तिचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
Nazar na lagey - 02/09/17 pic.twitter.com/F2Inu07kwH
— Resh (@ReshKay_) September 2, 2017
लंडनमध्ये सकाळी ड्राइव्हवर जात असताना हल्लेखोरांनी गाडीच्या खिडकीतून रेशमवर व तिच्या भावावर अॅसिड फेकलं होतं. या हल्ल्याप्रकरणी 25 वर्षीय जॉन तोमलीन याला अटक करण्यात आली. रेशमने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये तिने तिला आलेला अनुभव सांगितला आहे. तसंच माझ्या आयुष्यातील हा सर्वात भयानक दिवस असल्यातं तिने म्हंटलं आहे. अॅसिड हल्ल्यानंतर खचून न जाता रेशम उपचार तर घेत होती. पण त्याबरोबरच तिने ब्लॉग लिहायला सुरूवात केली. ब्लॉगमधून ती घटना कशी घडली आणि उपचार कसे सुरू आहेत, याबद्दल माहिती देत होती.
लंडनमध्ये सकाळी जेव्हा रेशम आणि तिच्या भावावर हल्ला झाला त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची गाडी तेथे असणाऱ्या एका कुंपणात अडकली. माझे कपडे जळत असल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते, असं रेशमने लिहिलं आहे. रेशम आणि तिच्या भावावर हल्ला झाल्यानंतर ते दोघे गाडीतून बाहेर पडून लोकांकडे मदत मागत होते. पण तेथे त्यावेळी मदतीसाठी कुणीही नव्हतं. 45 मिनिटांनंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडी चालकाने त्यांना स्थानिक हॉस्पिटलपर्यंत सोडलं. रेशमची मैत्रिण डॅनिअल मन हिने गो फंड मी (go fund me) या वेबसाइटवर ही माहिती देऊन लोकांनी रेशमच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
वाढदिवसाच्या दिवशीच अॅसिड हल्ल्यासारखी भीषण घटना घडल्याने शारीरिक त्रासासह मानसिक त्रासाचाही रेशम सामना करत होती. चेहऱ्यावर तसंच शरीरावरील काही भागांवर भाजल्याने यातून बाहेर पडण्याची चिंता मनात होती, असं रेशमने सांगितलं आहे. सल्फर अॅसिडचा हल्ला झाल्याने तिचा चेहरा जास्त भाजला होता. ज्यामुळे तिला डोळे बंद करणं आणि तोंड उघडणं शक्य नव्हतं. या हल्ल्यात रेशमचा चुलत भाऊही गंभीर जखमी झाला होता. त्याच्या उजव्या डोळ्याला जास्त दुखापत झाली.
जर सगळं काही कारणांमुळे होत असतं, तर नक्कीच माझ्यासोबत जे घडलं त्याच्या मागेही काही कारण असावं. या भीषण हल्ल्यातून मला काहीतरी नक्कीच चांगलं मिळणार असेल, असं रेशमने लिहिलं आहे. मी यापुढेही शरीरावर पडलेल्या चट्ट्यांवर उपचार करत राहणार आहे. मी जशी आधी दिसायचे, तशीच परत दिसीन, अशी मला आशा असल्याचं रेशमने लिहिलं आहे