नकाराधिकार वापरला तरी अझहरवर होणार कारवाई - अमेरिका
By admin | Published: April 4, 2017 05:05 PM2017-04-04T17:05:49+5:302017-04-04T17:05:49+5:30
कुठल्याही देशाने नकाराधिकार वापरून कितीही विरोध केला तरी मसूद अझहरवर कारवाई होणारच असा रोखठोक इशारा अमेरिकेने
Next
ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्रे, दि. 4 - कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीन नकाराधिकाराचा वापर करून सातत्याने खोडा घालत आहे. पण आता कुठल्याही देशाने नकाराधिकार वापरून कितीही विरोध केला तरी मसूद अझहरवर कारवाई होणारच असा रोखठोक इशारा अमेरिकेने दिला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत, पण चीनकडून नकाराधिकाराचा वापर करून त्यात वारंवार अडथळा आणण्यात येत आहे. अशा वेळी अमेरिकेचे हे वक्तव्य आंतराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी पदभार सांभाळल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काही मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या ज्या गोष्टींवर चर्चा झाली त्यात बंदी घालण्यात आलेल्या आणि यादीत असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. निक्की यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदी घाललेल्या दहशतवाद्यांच्या यादीबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी सुरक्षा परिषदेतील काही स्थायी सदस्य नकाराधिकाराचा वापर करून दहशतवाद्यांविरोधातील कारवाईच्या प्रयत्नांना कसे हाणून पाडत आहेत, याचा उल्लेख निकी यांनी चीनचे नाव न घेता केला. अशा प्रश्नी नकाराधिकाराचा वापर करणाऱ्यांबाबत आम्ही निश्चितपणे पावले उचलणार आहोत. अशा दहशतवाद्यांवर कारवाई करण्यापासून अमेरिकेला कुणीही रोखू शकत नाही. असेही त्यांनी सांगितले.