‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:40 IST2024-11-16T10:39:37+5:302024-11-16T10:40:34+5:30
मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटरचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर कंपनीचे नाव त्यांनी ‘एक्स’ असे केले होते.

‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना सक्रिय पाठिंबा देणे प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क यांना महागात पडल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर लोक मस्क यांच्या नेतृत्वाखालील समाज माध्यम मंच ‘एक्स’ला सोडचिठ्ठी देऊ लागले आहेत. आतापर्यंत तब्बल १,१५,००० लोकांनी ‘एक्स’ सोडले आहे. मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटरचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर कंपनीचे नाव त्यांनी ‘एक्स’ असे केले होते.
वाहिनीच्या वृत्तानुसार, १,१५,००० अमेरिकी वापरकर्त्यांनी एक्सवरील खाती डिॲक्टिव्हेट केली आहेत. विशेष म्हणजे हा आकडा केवळ वेबसाइटवरून डिॲक्टिव्हेट करणाऱ्या वापरकर्त्यांचा आहे. मोबाइल ॲपच्या वापरकर्त्यांचा त्यात समावेश नाही. दरम्यान, एक्सवर महिलांच्या विरोधात अवमानकारक शब्दांचा वापर वाढल्याचेही आढळून आले आहे.
कुठे जातायत लाेक?
एक्सला सोडचिठ्ठी देणारे लोक ‘ब्ल्यूस्काय’सारख्या समाज माध्यम मंचाकडे स्थलांतरित होताना दिसत आहेत. मागील ९० दिवसांत ब्ल्यूस्कायच्या वापरकर्त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. ब्ल्यूस्कायला एका सप्ताहात १ दशलक्ष नवीन साईन-अप प्राप्त झाले आहे. त्यासोबत मंचाच्या वापरकर्त्यांची संख्या १५ दशलक्ष झाली आहे.