अभिनेते विल्यम शॅटनरने रचला इतिहास, बनले अंतराळात प्रवास करणारे जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:03 AM2021-10-14T09:03:44+5:302021-10-14T09:03:58+5:30
Blue Origin Space Trip: जेफ बेझोस यांची कंपनी 'ब्लू ओरिजिन'चे अंतराळातील दुसरे उड्डाणदेखील यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
जगातील सर्वात अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या 'ब्लू ओरिजिन' कंपनीने दुसऱ्यांदा अंतराळ प्रवास केला. कंपनीच्या न्यू शेफर्ड रॉकेट-कॅप्सूलने दुसऱ्यांदा अवकाशात यशस्वी उड्डाण घेतली. विशेष म्हणजे यावेळीस रॉकेटमध्ये 90 वर्षीय कॅनेडियन अभिनेते विल्यम शॅटनरदेखील होते. अंतराळ प्रवास करुन त्यांनी इतिहास रचला आहे. अंतराळात प्रवास करणारे ते जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती बनले आहेत.
अभिनेते विल्यम शॅटनर यांच्यासोबत अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे माजी अभियंते ख्रिस बोशुनिजन, क्लिनिकल संशोधन उद्योजक ग्लेन डी व्रीज आणि ब्लू ओरिजिनचे उपाध्यक्ष आणि अभियंता ऑड्रे पॉवर्स होते. प्रत्येकजण फ्लाइटबद्दल खूप उत्सुक होते. ब्लू ओरिजिनचे 60 फुट लांब शेफर्ड रॉकेटमधून हे चौघे अंतराळात गेले. ब्लू ओरिजिनचे हे दुसरे खासगी उड्डाण होते. टेक्सास शहराबाहेरील ब्लू ओरिजिनच्या प्रक्षेपण स्थळावरुन या रॉकेटने उड्डाण घेतले तर परतल्यावर टेक्सासच्या वाळवंटात याचे लँडिंग झाले.
शॅटनर यांना स्टार ट्रेकने दिली प्रसिद्ध
विल्यम शॅटनर एक अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि गायक आहे. आता ते अंतराळवीरही झाले आहेत. शॅटनर सात दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.. 1960 च्या दशकात त्यांनी 'स्टार ट्रेक' या मालिकेत कॅप्टन जेम्स टी. किर्कची भूमिका साकारली होती. यानंतर याच मालिकेव आधारित चित्रपटातही त्यांनी कॅप्टन किर्कची भूमिका साकारली. त्यांनी आपल्या चित्रपटात अनेकदा अंतराळाचा प्रवास केला, पण खर्या आयुष्यात हा अनुभव पहिल्यांदाच घेतला.