एका पक्ष्याने अडकवला अदानींचा कोळसा प्रकल्प; ऑस्ट्रेलियाचा ठाम नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 03:53 PM2019-05-03T15:53:04+5:302019-05-03T16:07:34+5:30
पर्यावरण विभागाच्या अहवालानुसार क्वीन्सलँड सरकाने कारमायकल कोळसा खाण प्रकल्प थांबविला आहे.
मेलबर्न : भारतीय उद्योगपती आणि उर्जा क्षेत्रातील मोठे नाव असलेले अदानी यांना ऑस्ट्रेलियाच्या सरकारने मोठा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या एका पक्ष्याच्या जतनासाठी अदानींच्या प्रकल्पाला नकार दिला आहे. या प्रकल्पाची योजनाच मंजूर नसल्याचे या सरकारने सांगितले आहे.
तेथील प्रसिद्धी प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरण विभागाच्या अहवालानुसार क्वीन्सलँड सरकाने कारमायकल कोळसा खाण प्रकल्प थांबविला आहे. पर्यावरण खात्यानुसार या खाणीमुळे तेथील लुप्त होणारी पक्ष्याची प्रजाती नष्ट होऊ शकते. यामुळे अदाणी समुहाचा हा प्रकल्प रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या बाजुला या प्रकल्पामुळे पाण्याचे प्रदुषण होणार असल्याचाही आरोप होत आहे. याचा अभ्यास तेथील सरकार करत आहे. यामुळे या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळणे कठीण बनले आहे.
या प्रकल्पासमोर अडचणी उभ्या ठाकल्याने अदानींच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी तेथील पर्यावरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनीही सध्याच्या परिस्थितीनुसार या प्रकल्पाला मंजुरी देणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. यानंतर अदाणीच्या ऑस्ट्रेलियातील कार्यकारी अधिकाऱ्यांनी लुकास डॉव सांगितले की, पुन्हा नव्या प्रस्तावाद्वारे प्रकल्पासाठी सुरुवात करण्यात येणार आहे.
पर्यावरण विभागाच्या म्हणण्यानुसार या भागात काळा गळा असणाऱ्या पक्ष्यांची एक मोठी प्रजाती वास्तव्य करते. जी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे कंपनीला त्यांच्या योजनेबाबत पुन्हा विचार करायला हवा. महत्वाचे म्हणजे क्वीन्सलँड हे कोळसा खाणींमुळे वादात राहिलेले राज्य आहे. मात्र, अदाणींच्या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियाच्या संघ सरकारची मंजुरी मिळाली होती.