ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:23 AM2024-10-28T07:23:50+5:302024-10-28T07:24:34+5:30
५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असली तरी अमेरिकेच्या काही राज्यांत कितीतरी आधीच मतदानाला सुरुवात झाली आहे.
अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी (भारतीय वेळेनुसार ६ नोव्हेंबर रोजी) मतदान होत आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगातच याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प बाजी मारतात की कमला हॅरिस, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे. ५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असली तरी अमेरिकेच्या काही राज्यांत कितीतरी आधीच मतदानाला सुरुवात झाली आहे.
अमेरिकेत अर्ली वोटिंग, प्री-व्होटिंग किंवा ॲडव्हान्स व्होटिंगचा प्राथमिक मतदानाचा प्रकार प्रचलित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या तारखेच्या आधीच या प्रकारच्या मतदानाला सुरुवात होते. ॲडव्हान्स व्होटिंगच्या पद्धतीनं आतापर्यंत किती व्होटिंग झालं असावं? मंगळवार, दि.२२ ऑक्टोबरपर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक मतदारांचं मतदान करून झालं आहे. पूर्वीच्या ट्रेंडनुसार ॲडव्हान्स व्होटिंगमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा मोठा दबदबा होता, पण आता काही प्रमुख राज्यांमध्ये या मतदानात रिपब्लिकन पक्षानंही आघाडी घ्यायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात कोणता पक्ष निवडून येईल आणि कोणाचं सरकार येईल, याचं घोडामैदान फार दूर नसलं तरी या मतदानातही आघाडी घेण्याचा दोन्ही पक्षांचा आटापिटा सुरू आहे.
अमेरिकेच्या यंदाच्या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अग्रक्रमावर असलेले इलॉन मस्क हेदेखील यावेळी ट्रम्प यांच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत. ते खुलेपणानं ट्रम्प यांचं समर्थन करीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आणखीच रंगतदार झाली आहे. त्यांनी एक नवीनच घोषणा केली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या आधी जे मतदार मतदान करतील, त्यांच्यातून रोज एक भाग्यवान मतदार निवडला जाईल आणि मतदानाच्या तारखेपर्यंत त्यांना एक दशलक्ष डॉलर (सुमारे ८.४० कोटी रुपये) दिले जातील! अर्थात, त्यांनी ही योजना फक्त सात स्विंग स्टेट्ससाठीच लागू केली आहे. त्यांच्या या योजनेवरून जोरदार तर्क-वितर्क केले जात आहेत. मतदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे, असंही अनेकांचं म्हणणं आहे. जे मतदार ट्रम्प यांना मत देतील त्यांनाच ही योजना लागू असेल किंवा त्यांनी ट्रम्प यांना आपलं समर्थन जाहीर करावं असं त्यांनी प्रत्यक्ष म्हटलं नसलं, तरी ते ट्रम्प यांचा प्रचार करीत असल्यानं मतदारांना ही उघड लालूच आहे, असं म्हटलं जात आहे. यानिमित्त अमेरिकेत दोन्ही बाजूंनी दिग्गज विभागले गेले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत प्री- व्होटिंग किंवा ॲडव्हान्स व्होटिंगचा प्रकार प्रचलित असला, तरी याला खऱ्या अर्थानं वेगवान चालना मिळाली ती कोरोना काळात. २०२० च्या काळात बऱ्याच लोकांनी प्री-व्होटिंग मतदान पद्धतीचा वापर केला. अमेरिकेत वेगवेगळ्या प्रकारांनी ॲडव्हान्स व्होटिंग केलं जातं. ‘मेल इन व्होटिंग’ची सुविधा अमेरिकेच्या बऱ्याच राज्यांत आहे. या पद्धतीत अनेक मतदार टपालाद्वारे मतदान करतात. काही राज्यांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच पोलिंग सेंटरवर जाऊनही मतदार स्वत: मतदान करू शकतात. वेगवेगळ्या राज्यांत मतदानाची पद्धत वेगवेगळी असू शकते. जसं की वर्जिनिया येथे २० सप्टेंबरपासूनच मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचवेळी विस्कॉन्सिन प्रांतात मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यास विलंब असतो.
२०२०मध्ये कोरोनाच्या भीतीनं तब्बल ६.५ कोटी लोकांनी टपालाद्वारे मतदान केलं होतं, तर लोकांची गर्दी होईल आणि त्यात आपल्याला संसर्ग होऊ नये यासाठी ३.५८ कोटी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या आधीच मतदान केलं होतं. यावेळीही मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चाललीय, त्यानुसार ॲडव्हान्स व्होटिंग वाढत चाललं आहे. ‘न्यूजवीक’च्या वृत्तानुसार जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना राज्यांत १५ ऑक्टोबरपासून प्राथमिक मतदानाला सुरुवात झाली आहे. तिथे एकाच दिवसात दोन्ही ठिकाणी मिळून ७.५ लाखापेक्षाही अधिक मतदारांनी मतदान केलं.
‘डिपार्टमेंट ऑफ पब्लिक ॲण्ड इंटरनॅशनल अफेअर्स’च्या अहवालानुसार २०२०मध्ये सुमारे ६४ टक्के लोकांनी ॲडव्हान्स व्होटिंग केलं. हे आतापर्यंतचं सर्वाधिक प्रमाण आहे. २०१६ मध्ये हेच प्रमाण ३६.५० टक्के, २०१२ मध्ये ३१.६० टक्के, २००८मध्ये ३०.६० टक्के, २००४ मध्ये २२ टक्के, तर २००० मध्ये १६ टक्के होतं. १९८८ मध्ये फक्त सहा राज्यांत ही पद्धत होती. १९९२ पासून या प्रकारात वाढ होत गेली.
बंदुकीच्या गोळ्या झेलणारा ‘राष्ट्राध्यक्ष’!
या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे दोघंही मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पेनसिल्वानियाच्या बटलर येथे ट्रम्प यांनी नुकतीच पुन्हा प्रचार रॅलि काढली. याच ठिकाणी १३ जुलै रोजी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यासंदर्भात ट्रम्प यांचं कौतुक करताना इलॉन मस्क म्हणाले होते, एक राष्ट्राध्यक्ष (जो बायडेन) जिनेही चढू शकत नाही, तर दुसरा राष्ट्राध्यक्ष (डोनाल्ड ट्रम्प) बंदुकीच्या गोळ्या झेलूनही लढतो आहे!