कॅनडातील भारतीय अन् विद्यार्थ्यांसाठी विदेश मंत्रालयाकडून ॲडव्हायजरी जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 03:48 PM2023-09-20T15:48:37+5:302023-09-20T16:03:46+5:30
भारतीय विदेश मंत्रालयाने आज दुपारी भारतीय नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे.
नवी दिल्ली - कॅनडाचेपंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या विधानानंतर कॅनडातील भारतीय नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. त्यातच, आपली कमकुवत स्थिती खलिस्तानी समर्थकांच्या माध्यमाने बळकट करण्याचा प्रयत्न करत जस्टिन ट्रूडो सरकारने कॅनडातील नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली. त्यानुसार, भारताच्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर, आता भारताने कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे.
भारतीय विदेश मंत्रालयाने आज दुपारी भारतीय नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. कॅडनात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच, जे भारतीय कॅनडाला जाणार आहेत, त्यांनीही काळजी घ्वावी, असे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. कॅनडामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना व विद्यार्थ्यांना भारत सरकारने महत्त्वाची सूचना केली आहे. भारत विरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना किंवा भारतीयांना धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे, भारत विरोधी अजेंडा सुरू असलेल्या प्रदेश आणि भागात न जाण्याचे केंद्र सरकारने या अॅडव्हायजरीच्या माध्यमातून सूचवले आहे.
Advisory for Indian Nationals and Indian Students in Canada:https://t.co/zboZDH83iwpic.twitter.com/7YjzKbZBIK
— Arindam Bagchi (@MEAIndia) September 20, 2023
काय आहे प्रकरण? -
खालिस्तान समर्थक नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप केले आहेत. कॅनडाच्या संसदेत बोलताना, हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्ट्सचा हात असू शकतो, असे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी भारताच्या राजदुतालाही बर्खास्त केले. यावर भारतानेही याच पद्धतीची अॅक्शन घेत कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
कॅनडा सरकारकडून कॅनडियन नागरिकांना सूचना
कॅनडा सरकारच्या ट्रॅव्हल अॅडव्हायजरीमध्ये म्हणण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्य कारणास्तव कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. या भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. मात्र, कॅनाडाने जारी केलेल्या या अॅडव्हायजरीत केंद्र शासित प्रदेश लडाखचा उल्लेख करण्यात आलेला नाही. याशिवाय, या अॅडव्हायजरीमध्ये, कॅनडाच्या नागरिकांना नॉर्थ ईस्टमधील राज्य आसाम, आणि मणिपूरमध्ये देखील न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.