दहशतवादाला साथ न देण्याचा अफगाणिस्तानाला सल्ला
By admin | Published: December 26, 2015 02:24 AM2015-12-26T02:24:17+5:302015-12-26T02:24:17+5:30
दहशतवादाचा सीमेपलीकडून वाहणारा प्रवाह कमी होत नाही, तसेच त्यांना मिळणारा आश्रय कमी होत नाही तोपर्यंत अफगाणिस्तान यशस्वी होणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
काबूल : दहशतवादाचा सीमेपलीकडून वाहणारा प्रवाह कमी होत नाही, तसेच त्यांना मिळणारा आश्रय कमी होत नाही तोपर्यंत अफगाणिस्तान यशस्वी होणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानचे नाव न घेता केली. अफगाणिस्तानातील भारताची भूमिका योगदानाची असून प्रतिस्पर्ध्याची नाही. आम्ही भविष्याचा आधार तयार करण्यासाठी इथे आलो आहोत, संघर्ष वाढविणे आमचा हेतू नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारताच्या सहकार्याने अफगाणिस्तानमध्ये नवीन संसद उभारण्यात आली असून शुक्रवारी त्या इमारतीचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचे भविष्य दहशतवादाच्या मार्गाने जाऊन घडवले जाणार नाही.
भारताच्या ९ कोटी डॉलर्स मदतीने ही इमारत बांधण्यात आली असून संसद भवन परिसरात ‘अटल भवन’ असून त्याचेही उद्घाटन मोदी यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ हे नामकरण झाले आहे.