अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून २५ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:12 AM2018-11-01T04:12:47+5:302018-11-01T04:13:13+5:30
अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळून लष्कराच्या पश्चिम विभागाच्या उपप्रमुखांसह २५ जण ठार झाले.
काबूल : अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळून लष्कराच्या पश्चिम विभागाच्या उपप्रमुखांसह २५ जण ठार झाले. पश्चिमेकडील फराह प्रांतात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
फराह प्रांत राज्यपालांचे प्रवक्ते मोहंमद नासेर मेहरी यांनी सांगितले की, अनार दार जिल्ह्यानजीकच्या डोंगराळ भागातून हेरात प्रांताकडे रवाना झाल्यानंतर लागलीच हेलिकॉप्टर स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये लष्करी दलाचे कमांडर जन. नैमुदुल्लाह खलील, फराह प्रांत परिषदेचे चेअरमन फरीद बख्तावर आणि सदस्या जमिला अमिनी यांचाही समावेश होता. फराह प्रांतात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना होय. सप्टेंबरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून पाच जण ठार झाले होते.
दरम्यान, काबूलच्या पूर्वेकडील अफगाणमधील सर्वांत मोठ्या तुरुंगाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात तुरुंग आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सात जण ठार झाले. तुरुंग कर्मचाºयांना घेऊन जाणाºया वाहनाला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. पूल-ए-चरखी कारागृहात तालिबानांसह शेकडो कैदी आहेत. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी सांगितले.