आधी गोळी मारली नंतर गाडीखाली डोकं चिरडलं, दानिश यांच्या मृत्यूबाबत अफगाणी कमांडरचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:36 AM2021-07-21T11:36:57+5:302021-07-21T11:45:20+5:30
Danish Siddiqui Death : 16 जुलै रोजी दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्थानमध्ये हत्या करण्यात आली.
नवी दिल्ली: पुलित्जर पुरस्कार विजेते फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी (Journalist Danish Siddiqui) यांच्या मृत्यूबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. आतापर्यंत दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान झाल्याचे बोलले जात होते. दानिश यांच्या डेथ सर्टिफिकेटमध्येही गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दानिश सिद्दीकी यांना फक्त गोळीच मारण्यात आली नाही, तर तालिबानच्या दहशतवाद्यांनी त्यांचे डोके कारखाली चिरडल्याचे सांगण्यात येत आहे.
16 जुलै रोजी अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजारपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची तालिबानशी चकमक झाली. या चकमकीत एका अफगान अधिकाऱ्यासह दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली होती. पण, आजतक या वृत्तावाहिनीने अफगाण सैन्याचे कमांडर बिलाल अहमद यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितल्यानुसार, तालिबानने दानिशच्या मृतदेहासोबत वाईट कृत्य केले.
अहमद यांनी पुढ सांगितले की, तालिबानच्या दहशतवाद्यांनी आधी दानिश सिद्दीकी यांना गोळी मारली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अतिरेक्यांना समजलं की दानिश भारतीय आहेत. तालिबान भारताचा राग करतात म्हणून त्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना केली. मृत्यू झाल्यानंतरही दहशतवाद्यांनी दानिश यांच्या डोक्यावर गाडी चढवली आणि त्यांचं डोकं चिरडलं, अशी माहिती अफगाण कमांडर बिलाल अहमद यांनी दिली.