देशाचा खजाना चोरून नेला; इटरपोलनं अशरफ गनींना अटक करावी; अफगाण दुतावासाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:53 PM2021-08-18T17:53:07+5:302021-08-18T17:54:43+5:30
Afghanistan Taliban crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. यावेळी त्यांनी आपल्यासह चार गाड्यांमध्ये पैसे भरून नेल्याचंही रशियन दुतावासानं म्हटलं होतं.
अफगाणिस्तानवरतालिबानचा वाढता प्रभाव पाहून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला होता. तसंच जाताना त्यांनी आपल्यासोबत चार गाड्याभरून पैसे आणि चॉपर नेल्याचा दावा रशियन दुतावासानं प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं केला होता. दरम्यान, सध्या अशरफ गनी हे कोणत्या देशात आहेत याची माहिती समोर आलेली नाही. परंत आता ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासानं इंटरपोलला अशरफ गनी यांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. दुतावासानं इंटरपोलकडे अशरफ गनी आणि हमदुल्लाह मोहिम, तसंच फजल अहमद फाजली यांना सार्वजनिक संपत्ती चोरण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच ती संपत्ती अफगाणिस्तानला परत करण्यात यावी असंही म्हटलंय. टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अशरफ गनी यांनी पैशांनी भरलेल्या कार आणि चॉपर घेऊन पलायन केल्याचा दावा केला होता. तसंच रशियाची वृत्तसंस्था RIA आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं होतं. अशरफ गनी यांना काही पैसे या ठिकाणीच सोडून जावे लागले कारण ते त्यात ठेवू शकत नव्हते, असंही यावेळी सांगण्यात आलं.
Mohammad Zahir Aghbar, ambassador to Tajikistan, has said today that according to the Constitution, in the absence, escape or death of the president, the first vice president becomes the caretaker and Amrullah Saleh is currently the official acting president, sources said. pic.twitter.com/F3XEngNMj3
— TOLOnews (@TOLOnews) August 18, 2021
"चार कार्स या रोख रकमेनं भरलेल्या होत्या. त्यानंतर गनी यांनी काही रक्कम चॉपरमध्ये ठेवली. यानंतरही ते आपले पूर्ण पैसे त्यात ठेवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना काही पैस इकडेच ठेवून निघावं लागलं," अशी माहिती रशियाच्या दुतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंशचेन्को यांनी दिली होती. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हे वक्तव्य करत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
गनींचा फोटोही काढला
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केलं. त्यानंतर, उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचं काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषित केलं. सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी आता अमरुल्ला सालेह यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच, पंचशीरचा वाघ म्हटलं जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचाही फोटो दुतावासात लावण्यात आला आहे.