Afghanistan Crisis : तालिबानी चालवणार अफगाण सरकार, हालचाली सुरू; तालिबान कमांडरची माजी राष्ट्रपतींशी चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:43 AM2021-08-19T05:43:20+5:302021-08-19T05:43:49+5:30

Afghanistan Crisis : या बैठकीत करझाई यांच्यासोबत पदच्युत सरकारचे मुख्य शांतीदूत अब्दुल्ला अब्दुल्ला हेही हजर होते, असे तालिबानच्या सूत्रांनी गुप्ततेच्या अटीवर सांगितले.

Afghan government to run Taliban, start movement; Taliban commander discusses with former president | Afghanistan Crisis : तालिबानी चालवणार अफगाण सरकार, हालचाली सुरू; तालिबान कमांडरची माजी राष्ट्रपतींशी चर्चा 

Afghanistan Crisis : तालिबानी चालवणार अफगाण सरकार, हालचाली सुरू; तालिबान कमांडरची माजी राष्ट्रपतींशी चर्चा 

Next

काबूल : अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेणे सुरू केल्यानंतर काही दिवसांत तालिबान दहशतवाद्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानावर ताबा मिळवला. मागील काही दिवस तिथे उडालेला हाहाकार पाहता जगभरातील प्रमुख देशांनीही येथील नागरिकांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. अशा स्थितीत दहशतवाद्यांच्या हक्कानी नेटवर्कचे वरिष्ठ नेते आणि तालिबानी कमांडर अनस हक्कानी यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांची बुधवारी भेट घेऊन सरकार स्थापनेविषयी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या बैठकीत करझाई यांच्यासोबत पदच्युत सरकारचे मुख्य शांतीदूत अब्दुल्ला अब्दुल्ला हेही हजर होते, असे तालिबानच्या सूत्रांनी गुप्ततेच्या अटीवर सांगितले. हक्कानी नेटवर्क हे तालिबान्यांच्या अनेक गटांपैकी एक आहे. या नेटवर्कनेच रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळविला. हे नेटवर्क पाकिस्तानशी लागून असलेल्या भागात सक्रिय आहे. मागील काही वर्षांत अफगाणिस्तानातील अनेक मोठे दहशतवादी हल्ले हक्कानी नेटवर्कने केले आहेत.

तालिबान्यांनी ताबा मिळवला त्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशातून परागंदा झाले. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला राष्ट्रपती म्हणून घोषणा करीत तालिबान्यांशी संघर्ष सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले. तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक इतर देशांत पळ काढू लागले आहेत. काही शहरांमध्ये तालिबानी गटांकडून गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. ही अस्थिरता संपविण्यासाठीच तालिबानने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. (वृत्तसंस्था)

नागरिकांना देशाबाहेर जाऊ देण्यास तयार
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली विमानातून नागरिकांना सुरक्षितपणे जाऊ देण्याची तयारी तालिबानने दाखवली आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुल्लिवॅन यांनी दिली.

Web Title: Afghan government to run Taliban, start movement; Taliban commander discusses with former president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.