प्राध्यापकानं फाडल्या आपल्याच पदव्या - का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 11:09 AM2023-01-06T11:09:28+5:302023-01-06T11:09:41+5:30
काही दिवसांपूर्वीचीच घटना. तेथील इस्माइल मशाल या प्राध्यापकानं थेट एका लाइव्ह टीव्ही प्रोग्राममध्येच आपल्या साऱ्या शैक्षणिक पदव्या फाडून फेकल्या.
अमेरिकेनं २००१मध्ये अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला हटवून तिथे ‘लोकशाही’ आणली आणि महिलांना बरेच अधिकार मिळाले. त्यांनी तिथून काढता पाय घेताच तालिबाननं पुन्हा आपले हातपाय पसरले आणि २०२१मध्ये अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा कब्जा केला. महिलांचं जीणं त्यामुळे अक्षरश: मृत्यूसमान झालं आहे. राेज नवे अत्याचार, रोज नवे फतवे, रोज नव्या दंडुकेशाहीचा सामना तेथील महिलांना करावा लागतो आहे. पण अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये असताना तेथील महिला आणि जनतेनं अनुभवलेलं स्वातंत्र्याचं वारं त्यांना अजूनही गप्प बसू देत नाही. त्यामुळे तालिबानी अत्याचाराविरुद्ध अनेकजण जाहीरपणे पुढे येत आहेत.
काही दिवसांपूर्वीचीच घटना. तेथील इस्माइल मशाल या प्राध्यापकानं थेट एका लाइव्ह टीव्ही प्रोग्राममध्येच आपल्या साऱ्या शैक्षणिक पदव्या फाडून फेकल्या. या प्राध्यापकाचं म्हणणं होतं, ‘मला आता माझ्या या पदव्यांची काहीच गरज नाही. कारण आमच्या देशालाच शिक्षणाची काही गरज राहिलेली नाही. ज्या देशात माझ्या आई, बहिणीला शिक्षणाची परवानगी नाही, तिथे माझ्या या पदव्या सांभाळून तरी मी काय करू? अशा प्रकारची शिक्षणपद्धती मला मान्य नाही.’ अफगाणिस्तानमधील प्राध्यापकाच्या या जाहीर धाडसाचं सध्या जगभरातून कौतुक होत आहे. तालिबानी सरकारविरुद्ध बोलण्याची जी हिंमत त्यानं दाखवली, त्यामुळे सोशल मीडियावरही इस्माइल मशाल यांच्या अभिनंदनार्थ मोठ्या प्रमाणात युजर्स एकवटले आहेत.
अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर लगेचंच त्यांनी नवनवीन फतवे काढायला सुरुवात केली. त्यात अर्थातच त्यांनी सगळ्यात आधी मुस्कटदाबी केली ती महिलांची. महिलांचं हिंडणं फिरणं त्यांनी बंद केलं. त्यांच्यासाठीचा ड्रेसकोड पुन्हा लागू झाला. महिलांच्या नोकऱ्यांवर त्यांनी गदा आणली. शिक्षण बंद केलं. जुने प्रतिगामी कायदे पुन्हा अस्तित्वात आणले. तालिबानी कायदे मोडणाऱ्यांविरुद्ध जाहीरपणे शिक्षा देण्यात येऊ लागल्या. सार्वजनिक चौकात महिला-पुरुषांना चाबकाच्या फटक्यांनी फोडून काढण्यापासून ते खुलेआम फाशी देण्यापर्यंतचे प्रकारही पुन्हा सुरू झाले.
काही दिवसांपूर्वी तालिबाननं विद्यापीठातील अभ्यासासंदर्भात तरुणींनी कोणते विषय निवडायचे, या संदर्भातल्या त्यांच्या अधिकारांवर प्रतिबंध आणले. इंजिनिअरिंग, अर्थशास्त्र, विज्ञान, कृषी यासारख्या विषयांचा अभ्यास महिलांना करता येणार नाही, असा फतवा जारी केला. यापूर्वी काही दिवस आधीच तालिबाननं विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी दिली होती. तेव्हा अफगाणिस्तानातल्या हजारो तरुणींनी राज्याराज्यांत ही परीक्षा दिली होती, पण त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी महिलांना विद्यापीठीय शिक्षणच बंद करून टाकलं.
आज अशी परिस्थिती आहे की, महिला, मुली शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊ शकत नाहीत. त्या संदर्भातले नियम, कायदे अतिशय सरंजामी आहेत. पुरुषांसोबत महिला एकत्र प्रवास करू शकत नाहीत, त्या स्वत: वाहन चालवू शकत नाहीत, त्यासाठीचे परवाने त्यांना दिले जात नाहीत. हिजाब परिधान करणं ही तर अनिवार्य गोष्ट आहे. दुकानांच्या बाहेर महिलांचे फोटो, चित्रं असलेले फलक लावण्यास मनाई आहे.
अफगाणिस्तानातले अनेक कायदे तर त्यांच्या रोजच्या जगण्याशीही संबंधित आहेत. त्यांनी कसं वागावं, काय करावं, सार्वजनिक स्थळी त्यांचं वर्तन कसं असावं, याबाबतचे बारीक सारीक फतवे तालिबाननं जारी केले आहेत. दारू पिणं, अमली पदार्थांचा वापर करणं, कोणाशी शारीरिक संबंध ठेवणं, जोडीदारांनी एकमेकांशी प्रतारणा करणं... हे तर तालिबान्यांसाठी सर्वोच्च गुन्हे आहेत.
खुली मैदानं किंवा स्टेडियमसारख्या ठिकाणी या गुन्हेगारांना जाहीरपणे शिक्षा दिली जाते. ज्या ‘गुन्हेगारांना’ ही शिक्षा दिली जाते, ते पाहण्यासाठीही शेकडो, हजारो नागरिक तिथे गर्दी करतात. अलीकडच्या काळात व्यभिचार करणाऱ्या महिलांना जाहीरपणे चाबकाचे फटके दिल्याचे व्हिडीओ तर अक्षरश: रोज प्रसारित होत आहेत. मरणाची भीती असतानाही आज अफगाणिस्तानमध्ये अनेक महिला आणि नागरिक या अत्याचाराचा निषेध करताना दिसत आहेत. पण त्यातले कित्येकजण नंतर कोणालाच दिसले नाहीत, हादेखील इतिहास आहे.
‘चेहरा’ दिसला म्हणून जाहीर दंडुके!
अलीकडेच एका महिलेला तालिबान्यांनी जाहीर चाबकाचे फटके मारले. का? - तर तिनं संगीत ऐकलं म्हणून. एका महिलेला दंडुके मारून रक्तबंबाळ केलं, कारण चालताना तिचा हिजाब थोडा खाली सरकला. विद्यापीठातील अनेक तरुणींना पोलिसांनी फोडून काढलं, कारण त्यांचा चेहरा दिसत होता ! या साऱ्याच गोष्टी अफगाणिस्तानी नागरिक आणि महिलांना सहन होत नाहीयेत. त्यामुळे प्राणांची पर्वा न करता त्या तालिबान्यांविरुद्ध आवाज उठवताहेत.