शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 06:57 PM2024-09-19T18:57:08+5:302024-09-19T18:57:53+5:30
Smartphones Banned in School College: या सरकारने आधीही विविध प्रकारचे आदेश जारी केले आहेत.
Smartphones Banned in School College: अफगाणिस्तानच्यातालिबान सरकारचे रोज नवनवीन आदेश निघत आहेत. तालिबान सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घातली आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता शेख हैबतुल्ला अखुनजादा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. याआधीही तालिबान सरकारने अनेक आदेश जारी केले आहेत. त्यातील काही आदेश हे व्यक्तिगत स्वातंत्र्यात हस्तक्षेप असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. यापूर्वी, अफगाणिस्तानातील तालिबानच्या सत्ताधारी इस्लामी राजवटीत, विविध कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी महिलांबाबत अनेक कायदे केले गेले आहेत.
शिक्षण संस्थांच्या आत मोबाईल बंदीचा आदेश हैबतुल्ला अखुनजादा यांनी जारी केला आहे. महिलांबाबतचे काही आदेशही हैबतुल्ला यांनीच जारी केले. त्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्यांच्या शरीराचा सर्व भाग झाकणे बंधनकारक केले आहे. यासोबतच चेहरा झाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. कपडे पातळ, घट्ट किंवा लहान नसावेत, असेही आदेशात म्हटले होते.
मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, चांगल्या कलागुणांचा प्रचार करणे, मुस्लिमांचे चारित्र्य आणि वर्तन इस्लामिक कायद्यानुसार ठेवणे, महिलांना हिजाब घालण्यास प्रोत्साहित करणे आणि लोकांना इस्लामच्या पाच स्तंभांचे पालन करण्यास आमंत्रित करणे असे या आदेशांचे स्वरूप आहे. वाईटाच्या निर्मूलनामध्ये लोकांना इस्लामिक कायद्याने प्रतिबंधित केलेल्या गोष्टी करण्यापासून रोखणे समाविष्ट आहे. दरम्यान, मंत्रालय अफगाण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप युनायटेड नेशन्सकडून करण्यात आला आहे.