महिला हक्क कार्यकर्ती फ्रेश्ता यांची हत्या, भाऊ गंभीर जखमी; दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा कयास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 06:16 AM2020-12-26T06:16:37+5:302020-12-26T06:49:44+5:30
Afghan woman activist Freshta Kohistani gunned down in Kapisa province : ही हत्या दहशतवाद्यांनी केली असावी, असा अफगाण पोलिसांचा कयास आहे.
काबूल : अफगाणिस्तानातील महिला हक्क कार्यकर्ती फ्रेश्ता कोहिस्तानी यांची कपिसा प्रांतातील हेस-ए-अवल भागामध्ये गुरुवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात फ्रेश्ता यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
ही हत्या दहशतवाद्यांनी केली असावी, असा अफगाण पोलिसांचा कयास आहे. फ्रेश्ता कोहिस्तानींच्या हत्येची जबाबदारी अद्याप एकाही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही. फ्रेश्ता कोहिस्तानी या प्रांतिक कौन्सिलच्या माजी सदस्य होत्या. अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात फ्रेश्ता यांनी अफगाणिस्तानमध्ये निदर्शने केली होती. गझनी येथील पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रहमतुल्ला निकजाद यांची मंगळवारी हत्या करण्यात आली.
शांततेच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा कट
अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तेथील सरकार व तालिबानमध्ये कतार येथे सप्टेंबर महिन्यात चर्चा सुरू झाली. त्यात काही प्रमाणात प्रगतीही झाली. मग ही चर्चा पुढील महिन्यात जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली. ही चर्चा पुन्हा सुरू होण्यास आणखी काही विलंब लागेल. शांततेच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याकरिता हत्या करण्यात येत असाव्यात.