अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 11 जण ठार, इसिसनं स्वीकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:04 AM2019-06-14T11:04:48+5:302019-06-14T11:04:57+5:30
अफगाणिस्तानमधल्या पूर्व नांगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये एक आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे.
काबूलः अफगाणिस्तानमधल्या पूर्व नांगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये एक आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे. या आत्मघातकी हल्ल्यात दहशतवाद्यानं पोलिसांच्या चौकीजवळ स्वतःला उडवून घेतलं आहे. या दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी आहे. नांगरहार प्रांताच्या राज्यपालांनी सांगितलं की, इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे, तर इतर तीन मुलं जखमी आहेत. अफगाणिस्तानच्या सैन्यावर दररोज तालिबान आणि इसिसच्या दहशतवाद्यांकडून हल्ले केले जातात. या हल्ल्यात 13 इतर जण जखमी आहेत. त्यातील काही प्रकृती गंभीर आहे. या हल्लेखोरांच्या निशाण्यावर सैन्य आणि पोलीस कर्मचारी होते, असे नांगरहार प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते अताहुल्लाह खोगयानी म्हणाले आहेत. जलालाबाद या प्रांतात तालिबान आणि इसिसचे दहशतवादी सक्रिय आहेत. हा इसिसचा गडही समजला जातो. अफगाणिस्तानमध्ये शांती नांदावी, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच देशातल्या विविध तुरुंगातून 490 तालिबानी कैद्यांची सुटका करण्यात आली होती.