अफगाणिस्तानने भारताकडे धरण बांधण्यासाठी मदत मागितली, पाकिस्तानची युद्धाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 08:50 AM2023-12-25T08:50:40+5:302023-12-25T08:50:55+5:30
सध्या पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चांगले संबंध नाहीत. अफगाणिस्तानच्या सीमेवर धुमश्चक्री सुरु असते.
अफगाणिस्तानचे सत्ताधारी तालिबानने चित्राल नदीवर धरण बांधण्यासाठी भारताकडे मदत मागितली आहे. याद्वारे ४५ मेगावॉट वीजनिर्मिती केली जाईल आणि ३४ हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येणार आहे. परंतू, स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्यालाही करायला द्यायचे नाही अशा आडमुठ्या पाकिस्तानने यात खोडा घालण्यास सुरवात केली आहे. भारताने मदत केली किंवा धरण बांधले तर युद्धाचे निमंत्रण म्हणून पाहिले जाईल, असा इशारा दिला आहे.
सध्या पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चांगले संबंध नाहीत. अफगानिस्तानच्या सीमेवर धुमश्चक्री सुरु असते. बलुचिस्तानचे सूचना मंत्री जान अचकजई यांनी अफगानिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानला सहभागी केल्याशिवाय तालिबान यावर धरण बांधत असेल तर दोन देशांमधील युद्धाचे हे पहिले पाऊल असेल असे म्हटले आहे.
हा बंधारा बांधला गेला तर खैबर पख्तूनख्वातील २० लाख लोकांना पाण्याची टंचाई निर्माण होईल. कारण चित्राल (कुनार) नदीचे पाणी या भागाच्या गरजा मोठ्या प्रमाणावर भागविते. अफगाणिस्तानला रोखण्यासाठी पाकिस्तान या कुनार नदीचा प्रवाह वळवू शकते. कुनार नदीचे पाणी काबुल नदीला जाऊन मिळते. काबुलचा एकूण प्रवाह हा २१० करोड़ क्यूबिक मीटर आहे. तर एकट्या कुनारचा 150 करोड़ क्यूबिक मीटर एवढा आहे. ही नदी पाकिस्तानातून प्रवाहित होते आणि अफगानिस्तानात जाते. पाकिस्तान या नदीला खैबरच्या पंजकोरा नदीकडे वळवू शकते. यामुळे अफगानिस्तानात दुष्काळ पडू शकतो.
यामुळे अफगाणिस्तानचे हात दगडाखाली आहेत. असे असले तरी अफगाणिस्तानने नवाझ शरीफ पंतप्रधान असताना २०१३ मध्ये पाकिस्तानच्या मदतीने कुनार नदीवर 1,200 मेगावाटचा हायड्रोपॉवर प्रोजेक्ट निर्माणासाठी करार केला होता. याची किंमत सुमारे 22,400 कोटी रुपये होती. परंतु, पाकिस्तानने या प्रकल्पाला महत्व न देता दासू धरण बांधण्याकडे लक्ष दिले. हा बंधारा अजूनही सिंधु नदीवर निर्माणाधीन आहे. या कृत्याला अफगाणिस्तान विश्वासघात मानत आहे.