Afghanistan Crisis: तालिबानकडून अल-कायदा अन् ISIS च्या दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:51 AM2021-08-19T10:51:30+5:302021-08-19T10:53:02+5:30
Afghanistan Crisis: कंधारमधील स्टेडियममध्ये जमावासमोर तालिबानने अफगाण सैन्याच्या 4 कमांडरची हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली.
नवी दिल्ली - अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान क्रूरता दाखवणार नाही असा दावा करत आहे, पण हळुहळू त्याचे वास्तव आता समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत, ज्यात तालिबानी दहशतवादी अफगाणी नागरिकांना चाबकांनी मारहाण करत आहेत. तसेच, अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या लोकांना विमानतळात प्रवेश न देता त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले जात आहेत. विशेष म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानच्या तुरुंगातून दहशतवाद्यांचीही सुटका केली आहे.
कंधारमधील स्टेडियममध्ये जमावासमोर तालिबानने अफगाण सैन्याच्या 4 कमांडरची हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. हे कमांडर 13 ऑगस्ट रोजी तालिबानला शरण गेले होते. याशिवाय, कंधारमधील शाह वाली कोटचे पोलीस प्रमुख पाचा खान यांचीही तालिबानने हत्या केली आहे. तालिबानकडून अफगाणिस्तानच्या तुरुंगातून कैद्यांची मुक्तता करण्यात आली आहे. त्यामध्ये, अल कायदा आणि इसिसच्या दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेश पॉल वैद यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
आपण इस्लामिक अमिरातच्या दहशतवादाकडे जात आहोत की, पुन्हा एकदा 9/11 हल्ल्यासाठी निमंत्रण देत आहोत का? असा प्रश्न वैद यांनी उपस्थित केला आहे.
Taliban released all prisoners from Afghanistan prisons including some of Al-Qaeda and ISIS. Are we heading towards Islamic Emirates of Terrorism sponsoring another 9/11, this time militarily equipped by American tax player's money? Congratulations @JoeBiden. #WorldPhotographyDaypic.twitter.com/4RxU8dErK6
— Shesh Paul Vaid (@spvaid) August 19, 2021
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) मानवतावादी कारणास्तव अशरफ घनी आणि त्याच्या कुटुंबाला आश्रय दिला आहे. यूएईच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. दरम्यान, ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तान दूतावासाने इंटरपोलच्या माध्यमातून गैरव्यवहाराच्या आरोपावरुन फरार राष्ट्रपती अशरफ घनी, हमदुल्ला मोहिब आणि फजलुल्ला महमूद फजली यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
तालिबानकडून भारताशी व्यापार करण्यास बंदी
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व माल वाहतुकीवर बंदी घातली आहे. डॉ. सहाय म्हणाले की, भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि कांदा यासारख्या वस्तू आयात केल्या जातात.