Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली १० मोठी आश्वासानं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:06 PM2021-08-17T23:06:08+5:302021-08-17T23:06:52+5:30
Afghanistan Taliban Crisis Press Conference : अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दुतावासाला नुकसान पोहोचलं जाणार नसल्याचं तालिबाननं यादरम्यान दिलं आश्वासन. पाहा काय म्हटलंय तालिबाननं.
तालिबाननं रविवारी जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. अमेरिकन सैन्याच्या माघारी परतण्याच्या निर्णयानंतर तालिबाननं मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये पाय पसरण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, मंगळवारी तालिबाननं पहिल्यांदा माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद यानं माध्यमांशी संवाद साधला. तसंच यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबतही स्पष्टीकरण दिलं. यामध्ये महिलांप्रती तालिबानची भूमिका काय असेल, आंतरराष्ट्रीय संघटनांसह त्यांचे संबंध कसे असतील आणि माध्यमांसाठी त्यांचे काय नियम असतील अशा अनेक प्रश्नांवर त्यानं तालिबानची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, यावेळी तालिबाननं आंतरराष्ट्रीय समुदायानं आपल्याला मान्यता द्यावी अशी प्रमुख मागणी केली. याशिवाय अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दुतावासाला नुकसान पोहोचवलं जाणार नसल्याचं आश्वासन देत महिलांना आणि माध्यमांना काही सूट देणार असल्याचंही त्यानं सांगितलं.
The security of embassies in Kabul is of crucial importance to us. We would like to assure all foreign countries that our forces are there to ensure the security of all embassies, missions, international organizations, and aid agencies: Taliban spokesperson Zabihullah Mujahid pic.twitter.com/tmMKJifZc9
— ANI (@ANI) August 17, 2021
We would like to assure our neighbours & regional countries that we'll not allow our territory to be used against any country in the world. Global community should rest assured that we're committed that you will not be harmed anyway from our soil: Taliban spox Zabihullah Mujahid pic.twitter.com/IBzWsnq1SN
— ANI (@ANI) August 17, 2021
काय दिली आश्वासनं ?
- अफगाणिस्तानच्या भूमिचा वापर कोणत्याही देशाविरोधात कट रचण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी दिला जाणार नाही.
- कोणत्याही दुतावासाला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवलं जाणार नाही. त्यांना तालिबानद्वारे सुरक्षा पुरवली जाईल. काबुलमध्ये असलेल्या सर्वच दुतावासांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहेत, असंही मुजाहिद यानं सांगितलं. आम्ही सर्व देशांना हे आश्वासन देऊ इच्छितो की आमचं सर्व सैन्य सर्व दुतावासांचं, आंतरराष्ट्रीय संघटनांचं आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी उपस्थित असेल, असंही त्यानं स्पष्ट कंलं.
- महिलांना शरिया कायद्याप्रमाणे सूट आणि अधिकार देण्यात येईल. त्या आरोग्य विभागांत आणि शाळांमध्ये काम करू शकतील. परंतु माध्यमांमध्ये त्या काम करू शकतील का या प्रश्नावर मात्र त्यांनी फिरवून उत्तर दिलं. जेव्हा तालिबानचं सरकार अस्थित्त्वात येईल तेव्हा कोणती सूट दिली जाईल हे स्पष्ट केलं जाणार असल्याचं त्यानं सांगितलं.
- खासगी माध्यमांना स्वतंत्ररित्या काम करण्याची परवानगी असेल. परंतु पत्रकारांना अफगाणिस्तानच्या मूल्यांचं पालन करावं लागेल.
- आता अफगाण युद्ध संपलं आहे. ज्यांनी यापूर्वी तालिबानविरोधात युद्ध लढलं त्यांना माफ केलं जात आहे. कोणत्याही देशाशी बदला घेण्याची तालिबानची इच्छा नाही. यामध्ये माजी सैनिक आणि अफगाणिस्तानच्या सरकारच्या सदस्यांचाही समावेश आहे.
- अफगाणिस्तानमध्ये कोणती कोणाचंही अपहरण करू शकणार नाही. कोणी कोणाचा जीवही घेऊ शकत नाही. अफगाणिस्तानची सुरक्षा वाढवली जाणार आहे.
- तालिबानच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारेल आणि लोकांचं जीवनमानही उंचावेल.
- आमचं प्राधान्य प्रथम कायदा व्यवस्था स्थापन करणं आहे. त्यानंतर लोक या ठिकाणी सुखानं राहू शकतील असंही तालिबानच्या प्रवक्त्यानं म्हटलं.
- तालिबानमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणीही नुकसान पोहोचवणार नाही. कोणीही तुमचा दरवाजा ठोठावणार नाही, असं आश्वासनही यावेळी देण्यात आलं.
- यापूर्वीचं सरकार कोणत्याही योग्यतेचं नव्हतं. कोणालाही त्यांना सुरक्षित ठेवत येत नव्हतं. आता तालिबान सर्वांना सुरक्षा पुरवणार असल्याचं आश्वासनही प्रवक्त्यानं यावेळी दिलं.