Afghanistan Crisis: अमेरिकन पत्रकार वार्तांकन करताना तालिबानी पोहोचले, बंदुका उगारल्या अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:03 PM2021-08-20T12:03:01+5:302021-08-20T12:03:33+5:30
Afghanistan Crisis: तालिबानी दहशतवाद्यांनी महिला पत्रकाराला वार्तांकन करताना रोखलं; शूटिंगदेखील थांबवलं
काबुल: तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा करताच संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. लाखो लोक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. तालिबानींकडून देशातील जनतेला सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र जनतेचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. मिळेल त्या मार्गानं लोकांना देश सोडायचा आहे. त्यासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. पत्रकार परिषद घेऊन लोकांना आश्वस्त करणाऱ्या तालिबान्यांचा दावा भररस्त्यात उघडा पडताना दिसत आहे.
अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनच्या पत्रकार क्लेरिसा वार्ड अफगाणिस्तानातल्या सध्याच्या परिस्थितीवर वार्तांकन करत होत्या. त्याचवेळी तिथे तालिबानी दहशतवादी पोहोचले. त्यांनी वार्ड यांचं वार्तांकन रोखण्याचा प्रयत्न केला. चित्रीकरण करत असलेल्या व्यक्तीलादेखील थांबवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. महिला पत्रकारनं वार्तांकन थांबवण्यास नकार देताच तालिबान्यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी हत्यारं उचलली. त्यामुळे वार्ड यांना तिथून पळ काढावा लागला.
तालिबानची सत्ता आल्यानं अमेरिकन आणि अफगाणी नागरिक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्यांना काबुल विमानतळापर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. त्यावरच क्लेरिसा वार्ड वार्तांकन करत होत्या. तालिबानी गोळीबार करून, धमक्या देऊन लोकांना विमानतळावर जाऊ देत नसल्याचं वार्ड सांगत होत्या. त्यामुळेच तालिबानी दहशतवादी संतापले आणि त्यांनी वार्ड यांचं वार्तांकन थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार देताच दहशतवाद्यांनी शस्त्रं उगारत त्यांना धमकावलं.