Afghanistan Crisis: तालिबानला जबर दणका, तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 08:06 AM2021-08-21T08:06:08+5:302021-08-21T08:06:53+5:30
Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानमधील काही गटांनी त्यांचे भाग तालिबानच्या ताब्यातून हिसकावण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त करण्यात आल्याचा दावा अफगाण न्यूजने केला आहे.
काबुल - अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा करून एक आठवडा होत नाही तोच तालिबानला आव्हान मिळण्यास सुरुवात झाली आहे. (Afghanistan Crisis) अफगाणिस्तानमधील काही गटांनी त्यांचे भाग तालिबानच्या (Taliban) ताब्यातून हिसकावण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त करण्यात आल्याचा दावा अफगाण न्यूजने केला आहे. मात्र तालिबानने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ( Three districts liberated from terrorists Taliban in Afghanistan)
अब्दुल हामिद दादगर यांनी तालिबानच्या ताब्यात असलेल्या अंद्राब बघलान प्रांतातली तीन जिल्ह्यांना मुक्त केले आहे, असा दावा अफगाण न्यूजने केला आहे. मात्र तालिबान यावर काहीही बोललेले नाही. दुसरीकडे अफगाणिस्तानमधील पंजशीर भागात तालिबान विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकांनी आघाडी उघडली आहे. या सर्वांचे नेतृत्व अहमद मसूद करत आहे. अहमद मसूद हे तालिबानला पराभवाची धूळ चारणारे अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत.
अहमद मसूद यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील एका लेखाच्या माध्यमातून तालिबानविरोधातील लढाईला अधिकाधिक बळ देण्याचे संकेत दिले आहे. तसेच पंजशीर भागात त्यांच्यासोबत मुजाहिद्दीनचे हजारो योद्धे आहेत. ते तालिबानविरोधात लढण्यासाठी तयार आहेत, असे सांगितले. अमेरिका अफगाणिस्तानमधून निघून गेली असली तरी ते आम्हाला हत्यारे आणि इतर मदत करू शकतात. त्यामाध्यमातून आम्ही तालिबानला मात देऊ शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, अफगाणिस्तानच्या सैन्यातील अनेक आजी-माजी सैनिक पंजशीरमध्ये अहमद शाह मसूदसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वत:ला अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित करणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांनीही तालिबानविरोधात आघाडी उघडली आहे. तसेच ते तालिबानविरोधात सातत्याने रणनीती आखत आहेत. त्यासाठी माजी सैनिक, पोलीस आणि इतरांसोबत ते चर्चा करत आहे. अमरुल्लाह सालेह सध्या पंजशीर प्रांतात आहेत. त्यामुळे तालिबानला येथून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.