Afghanistan Crisis : तालिबानींमुळे व्यापारकोंडी! रोखले व्यापारी मार्ग, अफगाणिस्तानशी तूर्तास आयात-निर्यात व्यवहार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:14 AM2021-08-20T07:14:38+5:302021-08-20T07:14:57+5:30
Afghanistan Crisis : अफगाणमधील परिस्थितीसंदर्भात भारतीय निर्यात महासंघाने (एफआयईओ) चिंता व्यक्त केली आहे.
काबूल/नवी दिल्ली : तालिबानींनीअफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर त्याचा फटका अनेक देशांना बसला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. पाकिस्तानमार्गे भारतात होणाऱ्या व्यापारावर तालिबानींनी खडा पहारा ठेवला असल्याने व्यापाराची कोंडी झाली असून आयात-निर्यात तूर्तास बंद झाली आहे. अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर सुकामेवा भारतात आयात होत असतो.
अफगाणमधील परिस्थितीसंदर्भात भारतीय निर्यात महासंघाने (एफआयईओ) चिंता व्यक्त केली आहे. महासंघाचे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, ‘अफगाणिस्तानच्या सीमारेषा चारही बाजूंनी जमिनीने वेढल्या आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानमार्गे आयात वा निर्यात करणे अधिक सोयीस्कर ठरत असते. मात्र, अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती पाहता व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. अफगाणिस्तानात सध्या सर्वच स्तरांवर अनिश्चितता आहे.
पाकमार्गे येणाऱ्या वा जाणाऱ्या मालवाहतुकीवर तालिबानींनी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी आयात-निर्यात बंद राहणार आहे. परिणामी, सुकामेवा व मिठाईच्या किमती नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्गाने आपल्या हितरक्षणासाठी सरकारकडून पतहमी घ्यावी, असा सल्लाही सहाय यांनी दिला आहे. (वृत्तसंस्था)
गोळीबारात तीन ठार : तालिबानविरोधात अफगाणिस्तानात ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. त्यातच गुरुवारी अफगाणिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांवर तालिबानींनी गोळीबार केला. यावेळी झालेल्या गोंधळात तीन जण ठार झाले. अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज अजून ठरायचा असून सध्याचा ध्वज मान्य नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे.
द्विपक्षीय व्यापार
२०१९-२०२० : १.४ अब्ज डॉलर
२०२०-२०२१ : १.५२ अब्ज डॉलर
आयात-निर्यात (२०२०-२०२१)
८२६ दशलक्ष डॉलर मूल्याची निर्यात
५१० दशलक्ष डॉलर मूल्याची आयात
लोकशाही नाहीच
अफगाणिस्तानात लोकशाहीला थारा नसेल. सत्तासंचालनासाठी प्रमुख नेत्यांची एक समिती तयार केली जाईल आणि त्याचे नेतृत्व हैबतुल्ला अखुंदजादा याच्याकडे असेल, असे तालिबानचा वरिष्ठ नेता वहिदुल्ला हाशिमी याने सांगितले.