Afghanistan Crisis : तुरुंगातून बाहेर पडलेल्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता, जोरदार प्रत्युत्तर देऊ - जो बायडन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:10 AM2021-08-21T06:10:39+5:302021-08-21T06:12:06+5:30
joe biden : सर्व लोकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असे जो बायडन यांनी सांगितले.
वॉशिंग्टनः अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढले जात असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना म्हटले. आतापर्यंत १८,००० हून अधिक अमेरिकन लोकांची सुटका करण्यात आली आहे. यासाठी आम्ही उड्डाणांची संख्याही वाढवली आहे. सर्व लोकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असे जो बायडन यांनी सांगितले.
दरम्यान, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर येथील परदेशी नागरिकांना वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु केले जात आहेत. तालिबानपासून वाचवण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकांसह इतर देशांचे नागरिका आणि असुरक्षित अफगाण नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे.
१४ ऑगस्टपासून लष्करी एअरलिफ्ट सुरू झाल्यापासून आम्ही जुलैपासून १८,००० हून अधिक लोकांना आणि जवळपास १३,००० लोकांना (काबूलमधून) बाहेर काढले आहे. आज ५,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यात आले. काबूलमध्ये ६,००० अमेरिकी सैन्य आहे. कोणत्याही हल्ल्याला आम्ही ताकदीने प्रत्युत्तर देऊ, असे जो बायडन म्हणाले.
We have already evacuated more than 18,000 people since July & approximately 13,000 people (from Kabul) since our military airlift began on August 14: US President Joe Biden pic.twitter.com/EeVLPpojFx
— ANI (@ANI) August 20, 2021
'दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भीती'
अफगाणिस्तानवरील संकट सध्या मोठे आहे. आम्ही अफगाणिस्तानबरोबर २० वर्षे जवळून काम केले. आम्ही गंभीरपणे काम केले असे सांगत तुरुंगातून बाहेर पडलेल्या दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भीती जो बायडन यांनी यावेळी व्यक्त केली. तुरुंगातून बाहेर पडलेले इसिसचे दहशतवादी हल्ले करू शकतात. इसिसचे दहशतवादी हा सर्वात मोठा धोका बनू शकतो. आता अमेरिकेच्या लष्करावर काही हल्ला झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही. कोणत्याही हल्ल्याचे उत्तर ताकदीने दिले जाईल, असे जो बायडन म्हणाले.
'काबुल विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था'
अफगाणिस्तानमध्ये अजून अमेरिकेचे किती नागरिक आहेत, याची पडताळणी केली जात आहे. अफगाणिस्तान सोडून ज्या अमेरिकेच्या नागरिकांना परत यायचे आहे, त्या सर्वांना परत आणले जाईल. आतापर्यंत अमेरिकेच्या २०४ पत्रकारांना बाहेर काढण्यात आले आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. काबुल विमानतळाजवळ बारकाईने नजर ठेवून आहोत. कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचा धोक्याबाबत आम्ही सावध आहोत, असे जो बायडन यांनी सांगितले.
पुढच्या आठवड्यात जी-७ बैठक होणार
तालिबानने अमेरिकेच्या कुठल्याही नागरिकाला विमानतळावर जाण्यापासून रोखल्याचे संकेत नाहीत. तरीही नागरिकांना सुरक्षितपणे काबुल विमानतळापर्यंत नेण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांची मदत देण्याबाबत विचार केला जाईल. तसेच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पुढच्या आठवड्यात जी-७ बैठक होणार आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांच्याशी आमची चर्चा झाली आहे, असे जो बायडन यांनी सांगितले.