Afghanistan Crisis: काबूल स्फोटाचा अमेरिकेकडून बदला; अफगाणिस्तानातील आयसिसच्या अड्ड्यावर एअर स्ट्राईक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:06 AM2021-08-28T09:06:17+5:302021-08-28T09:13:44+5:30
अफगाणिस्तानातील नांगहार प्रांतात अमेरिकन सैन्याची कारवाई; ड्रोनच्या मदतीनं एअर स्ट्राईक
काबूल: अफगाणिस्तानाची राजधानी काबूल दोन गुरुवारी स्फोटांनी हादरली. आयसिस-केच्या दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात १७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यात १३ अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. या स्फोटानंतर आता अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल जोरदार कारवाई सुरू केली आहे. शनिवारी (आज) अमेरिकन सैन्यानं आयसिस-केच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात काबूल स्फोटाचा कारस्थान रचणारा मारला गेल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या नांगहार प्रांतात ही कारवाई करण्यात आली. अमेरिकन सैन्यानं ड्रोनच्या मदतीनं आयसिस-केच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं.
नांगहार प्रांतात आयसिसचं वर्चस्व आहे. या हल्ल्यात काबूल स्फोटाचा सूत्रधार मारला गेल्याचा अमेरिकेचा दावा आहे. या हल्ल्यात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला इजा झालेली नाही. अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय असलेल्या पेंटागॉननं हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातल्या नांगहार प्रांतात एक एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार आम्ही मुख्य सूत्रधाराचा खात्मा केला आहे, अशी माहिती सेंट्रल कमांडचे कॅप्टन बिल अर्बन यांनी दिली.
US carried out drone strike against Islamic State 'planner' in Afghanistan, reports AFP news agency quoting Pentagon
— ANI (@ANI) August 28, 2021
काबूल विमानतळावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे. विमानतळाच्या आसपास पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा अंदाज अमेरिकन गुप्तचर विभागानं वर्तवला आहे. हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकनं अफगाणिस्तानमधील स्वत:च्या नागरिकांना विमानतळाच्या प्रवेशद्वारांपासून दूर राहायला सांगितलं आहे. तशी स्पष्ट सूचना अमेरिकन दूतावासानं दिली आहे. याशिवाय अमेरिकन दूतावासानं विमानतळाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी नियमावलीदेखील जारी केली आहे.