Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात अमेरिकेला २० वर्षांत किती मोठं नुकसान? आकडा पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 01:22 PM2021-08-23T13:22:15+5:302021-08-23T13:22:33+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात २० वर्षांपासून अमेरिका आणि तालिबानमध्ये संघर्ष
नवी दिल्ली: अफगाणिस्तानात २० वर्षांनंतर तालिबानची सत्ता आली आहे. २००१ ते २०२१ या कालावधीत अमेरिकन फौजा अफगाणिस्तानात तैनात होत्या. या कालावधीत अमेरिकन सैन्य आणि तालिबान यांच्यात युद्ध सुरू होतं. या कालावधीत अमेरिकेनं प्रचंड मोठी रक्कम खर्च केली. मात्र अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकेनं केलेला खर्च वाया गेल्याचं दिसत आहे. अमेरिकन सरकारनं केलेल्या खर्चामुळे शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेच्या कंपन्यांचा प्रचंड फायदा झाला. गेल्या २० वर्षांत या कंपन्यांच्या किमती जवळपास १२ पटींनी वधारले.
अमेरिकेनं अफगाणिस्तानात गेल्या २० वर्षांत केलेल्या खर्चाबद्दलचा एक अहवाल ब्राऊन विद्यापीठानं प्रसिद्ध केला आहे. '२००१ पासून अमेरिकेनं अफगाणिस्तानातील युद्धावर एकूण २.२६ ट्रिलियन (२२६० अब्ज) डॉलर खर्च केले. म्हणजेच या युद्दामुळे २० वर्षे अमेरिकेला दररोज ३० कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं,' अशी आकडेवारी अहवालात आहे. 'द इंटरसेप्ट'च्या अहवालानुसार, ५ संरक्षण कंपन्यांनी युद्धादरम्यान बक्कळ नफा कमावला. यामध्ये बोईंग पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रेथेऑन, लॉकहिड मार्टिन, जीडी, नॉर्थरोप ग्रुमॅनच्या क्रमांक लागतो.
'एखाद्या व्यक्तीनं १८ सप्टेंबर २००१ रोजी या कंपन्यांमध्ये १० हजार डॉलरची गुंतवणूक केली असेल, तर आता त्याचं मूल्य जवळपास १ लाख डॉलर असू शकेल. १८ सप्टेंबर २००१ रोजीच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तानात सैन्य कारवाई करण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातील आपल्या सैन्यावर एकूण ८३ अब्ज डॉलर खर्च केले. म्हणजेच दरवर्षी ४ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली,' अशी आकडेवारी इंटरसेप्टच्या अहवालात आहे.