Afghanistan Crisis: काबुल विमानतळ पुन्हा निशाण्यावर, बॉम्बस्फोटांची शक्यता; 'त्या' अलर्टमुळे एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:15 AM2021-08-27T10:15:32+5:302021-08-27T10:26:37+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या राजधानीत काल बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ले; ९० जणांचा मृत्यू
काबुल: तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लाखो लोक देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी राजधानी काबुलमधील विमानतळावर तीन स्फोट झाले. यात ९० जणांचा मृत्यू झाला. काबुल विमानतळावर आणखी हल्ले होऊ शकतात असा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनीनं (ABC) याबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. विमानतळाच्या उत्तरेकडील द्वारावर बॉम्बस्फोटाचा धोका आहे. त्यामुळे काबूलमधील अमेरिकन दूतावासासाठीदेखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काबुल विमानतळावर झालेल्या स्फोटांमध्ये १३ अमेरिकन जवानांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेट-खुरासाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे. अमेरिकेच्या जवानांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना वेचून वेचून मारू, असा गर्भित इशारा बायडन यांनी दिला.
गुरुवारी हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अब्बे गेटवर पहिला स्फोट झाला. त्यानंतर काही वेळातच विमानतळाच्या जवळ असलेल्या बॅरन हॉटेलजवळ दुसरा स्फोट झाला. इथेच ब्रिटिश सैनिक थांबले होते. विमानतळाजवळ ३ संशयित दिसून आले. त्यातले २ आत्मघाती हल्लेखोर होते. तर तिसरा बंदूक घेऊन आला होता. मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढण्याची भीती आहे, अशी माहिती अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं पेंटॉगॉननं दिली.