Afghanistan Crisis : अफगाणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष, तालिबानच्या सशस्त्र चेक पॉइंटमुळे अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:24 AM2021-08-21T06:24:11+5:302021-08-21T06:24:53+5:30

Afghanistan Crisis : काबूलसह अनेक  ठिकाणी तालिबानने सशस्त्र चेक पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला अतिशय अडथळे निर्माण झाले आहेत.

Afghanistan Crisis: US struggles to evacuate Afghans, Taliban armed checkpoints hamper | Afghanistan Crisis : अफगाणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष, तालिबानच्या सशस्त्र चेक पॉइंटमुळे अडथळे

Afghanistan Crisis : अफगाणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष, तालिबानच्या सशस्त्र चेक पॉइंटमुळे अडथळे

Next

वॉशिंग्टन : तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने तेथून आपल्या तसेच देश सोडून बाहेर जाणाऱ्या अफगाण नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नांची गती मंदावली आहे. काबूल विमानतळापर्यंत येण्याच्या मार्गात ठिकठिकाणी तालिबानी बंडखोरांनी उभे केलेले सशस्त्र चेक पॉइंट तसेच कागदोपत्री अडचणींमुळे नागरिकांना वेगाने एअरलिफ्ट करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टच्या डेडलाइनपर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
काबूलसह अनेक  ठिकाणी तालिबानने सशस्त्र चेक पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला अतिशय अडथळे निर्माण झाले आहेत. पाश्चिमात्य देशांसोबत यापूर्वी काम केलेल्यांना भीती आहे, की तालिबान त्यांना लक्ष्य करेल. कोणतीही कागदपत्रे नसलेले शेकडो अफगाण नागरिक विमानतळाबाहेर धडकत आहेत. त्यामुळे योग्य परवानगी आणि कागदपत्रे असलेल्या नागरिकांचीही कोंडी झाली आहे. त्यातच चेक पॉइंटवर अनेक अशिक्षित बंडखोर ठेवल्यामुळे अनेकांना कागदपत्रे वाचताच आली नाही. परिणामी अशा बिकट परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.  अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीसाठी ३१ ऑगस्टची डेडलाइन आहे. अशा अराजकतेच्या परिस्थितीत अजूनही हजारो नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यामुळे या डेडलाइनचे काय होणार आणि त्यानंतर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

५२०० अमेरिकन सैनिक तैनात
पेंटागॉनने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार काबूलमध्ये अमेरिकेचे केवळ ५२०० लष्करी जवान तैनात आहेत. अमेरिकन लष्कराचे मेजर जनरल विल्यम टेलर यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. काबूल विमानतळ हे सुरक्षित असून, तेथून विमान उड्डाणेही घेत आहे, असेही टेलर यांनी सांगितले. 

आतापर्यंत सात हजार नागरिकांना हलविले
काबूल विमानतळावरील जवळजवळ सहा हजार जणांना अमेरिकेच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले. 
ते म्हणाले, की या नागरिकांना लवकरच विमानाने हलवले जाईल. अमेरिकेच्या सी-१७ एस या विमानाने १२ फेऱ्यांमध्ये २००० जणांना सुरक्षितस्थळी हलवले असून, १४ ऑगस्टपासून एकूण ७००० जणांना सुरक्षितस्थळी हलविले.

प्रक्रिया गतिमान होणार
नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया लवकरच गतिमान होईल, असे पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, की कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रियादेखील वेगाने करण्याचे प्रयत्न आहेत. दररोज पाच ते नऊ हजार नागरिकांना बाहेर काढता येईल, एवढे विमाने उपलब्ध आहेत.

१६० ऑस्ट्रेलियन व अफगाण नागरिकांना काढले बाहेर
-  ऑस्ट्रेलियाने पाठविलेल्या तिसऱ्या विमानाद्वारे १६० ऑस्ट्रेलियन आणि अफगाण नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली. 
-  गेल्या २० वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाची मदत करणाऱ्या ६० अफगाण नागरिकांना संयुक्त अरब अमिरात येथे पाठविण्यात आले तर ९४ लोकांना घेऊन येणारे एक विमान पर्थ येथे उतरले.  मात्र, काबूलव्यतिरिक्त अफगाणिस्तानातील इतर नागरिकांना बाहेर काढता आले नाही, असेही मॉरिसन म्हणाले. 

Web Title: Afghanistan Crisis: US struggles to evacuate Afghans, Taliban armed checkpoints hamper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.