Afghanistan Crisis: आत येऊ द्या, अन्यथा तालिबानी मारून टाकतील; अफगाणी महिलांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:01 PM2021-08-19T12:01:08+5:302021-08-19T12:01:31+5:30
Afghanistan Crisis: अफगाणी नागरिक देश सोडून देण्याच्या प्रयत्नात; मात्र वाट सापडेना
काबुल: अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. काबुलच्या विमानतळावरील गर्दी कायम आहे. दिवसागणिक गर्दी वाढत आहे. याच गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काबुल विमानतळावर प्रवेश करू देण्याची विनंती करणाऱ्या अफगाणी महिलांचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. विमानतळावर प्रवेश करू देण्यासाठी महिला अमेरिकन सैन्याकडे गयावया करत आहेत. मात्र त्यांना यश येत नाही. काबुलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिका आणि नाटोच्या सैन्यानं बॅरिकेडिंग केलं आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिलं जात आहे. त्याच दरम्यान काही अफगाणी महिला विमानतळावर पोहोचल्या आणि सैनिकांकडे विनवण्या करू लागल्या.
At #kabulairport gates where the US forces controlling, people crying and begging US forces to allow them to pass the gates otherwise the Taliban will come and will behead them. pic.twitter.com/wzxXJf2ngL
— Natiq Malikzada (@natiqmalikzada) August 18, 2021
व्हिडीओमध्ये महिला मदतीसाठी विनवण्या करत आहेत. रडत, आक्रोश करत महिला मदतीसाठी आवाहन करत आहेत. तालिबानी येत आहेत. ते आम्हाला मारून टाकतील. कृपया आम्हाला आत घ्या, अशा शब्दांत महिला गयावया करत आहेत. मात्र अमेरिकन सैनिकांनी दरवाजा उघडला नाही. सध्याच्या घडीला काबुल विमानतळाजवळ ५० हजारांहून अधिक अफगाणी नागरिक उपस्थित आहेत. त्यांना देश सोडून जायचं आहे. देशात थांबल्यास तालिबान्यांचे जुलूम सहन करावे लागतील अशी भीती त्यांच्या मनात आहेत.
अमेरिकन सैन्य सर्वप्रथम आपल्या नागरिकांची सुटका करत आहे. त्यानंतर अमेरिकेला मदत करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे. इतर देशांनीदेखील आपापल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरीही विमानतळावरील अफगाणी नागरिकांची गर्दी कायम आहे. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.